
स्थैर्य, फलटण, दि. १९ ऑक्टोबर : आगामी जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर वाठार निंबाळकर गटातील राजकीय वातावरण तापू लागले आहे. एक सुशिक्षित आणि अभ्यासू चेहरा म्हणून ढवळ गावचे विद्यमान ग्रामपंचायत सदस्य विजयकुमार बबन लोखंडे यांनी राजे गटाकडे उमेदवारीची इच्छा व्यक्त केली आहे. गटाने संधी दिल्यास वाठार निंबाळकर गटातून पूर्ण ताकदीने निवडणूक लढवणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.
विजयकुमार लोखंडे यांच्या या घोषणेमुळे गटातील, विशेषतः युवक कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. लोखंडे यांना घरातूनच सामाजिक आणि राजकीय कार्याचा भक्कम वारसा लाभला आहे. त्यांच्या कुटुंबात गेल्या ३० वर्षांपासून ग्रामपंचायत सदस्य ते सरपंच पदापर्यंतची राजकीय परंपरा आहे. या पार्श्वभूमीमुळे लोखंडे कुटुंबियांचा परिसरातील नागरिकांशी दांडगा संपर्क आहे.
उच्चशिक्षित असलेले विजयकुमार लोखंडे हे एमबीए (MBA) पदवीधर आहेत. सामाजिक, शैक्षणिक तसेच सर्वसामान्य लोकांच्या प्रश्नांची त्यांना उत्तम जाण आहे. कोरोनाच्या कठीण काळात त्यांनी विविध ठिकाणी नागरिकांना आवश्यक सेवा पुरवून मोठा आधार दिला होता. त्यांच्या सामाजिक कार्याचा ठसा परिसरात स्पष्टपणे दिसून येतो.
स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप करणे, रक्तदान शिबिरांचे आयोजन करणे, समाजातील गरजू कुटुंबांना वैद्यकीय मदत मिळवून देणे आणि शासकीय योजना सर्वसामान्य लोकांपर्यंत पोहोचवून त्यांना लाभ मिळवून देण्यासाठी सक्रिय मदत करणे, अशा अनेक उपक्रमांमुळे ते परिसरात एक परिचित व्यक्तिमत्व बनले आहेत.
“एक संधी विकासाला आणि एक संधी मेहनती युवकाला,” अशी साद घालत त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. जिल्हा परिषदेच्या माध्यमातून वाठार निंबाळकर गटामध्ये विविध विकास योजना आणून शेतकरी, कष्टकरी, महिला, मजूर, युवक आणि सामान्य नागरिकांच्या जीवनात आमूलाग्र बदल घडवून आणण्याचे स्वप्न त्यांनी बाळगले आहे.
राजे गटातील वरिष्ठांनी संधी दिल्यास आणि परिसरातील जनतेचा विश्वास व आशीर्वाद लाभल्यास, आपण अधिक जोमाने काम करू, अशी इच्छा विजयकुमार लोखंडे यांनी व्यक्त केली आहे. त्यांच्या या भूमिकेमुळे वाठार निंबाळकर गटातील जनतेमध्ये त्यांच्या संभाव्य उमेदवारीबाबत मोठी उत्सुकता निर्माण झाली आहे.