वाठार हायस्कूलच्या २००७ च्या बॅचचा अनोखा उपक्रम; सामाजिक बांधिलकी जपत साजरा केला स्वातंत्र्यदिन

वृद्धाश्रमात फळवाटप, तर शाळेतील विद्यार्थ्यांना केले शैक्षणिक साहित्य वाटप


स्थैर्य, वाठार निंबाळकर, दि. 17 ऑगस्ट : ज्या समाजात आपण घडतो, त्या समाजाचे ऋण फेडणे हे आपले कर्तव्य आहे, याच भावनेतून वाठार हायस्कूलच्या एसएससी मार्च २००७ च्या बॅचच्या माजी विद्यार्थ्यांनी भारतीय स्वातंत्र्याच्या ७९ व्या वर्धापन दिनानिमित्त एक अनोखा उपक्रम राबवला. ‘एक प्रयत्न सामाजिक बांधिलकी जपण्याचा’ या शीर्षकाखाली त्यांनी विविध सामाजिक कार्यक्रमांचे आयोजन केले.

या उपक्रमाची सुरुवात ‘आई अनाथ आश्रम’, मलठण आणि ‘ओमकार वृद्धाश्रम’, कुरवली खुर्द येथील वृद्धांना फळे वाटप करून करण्यात आली. त्यानंतर, ज्या शाळांमध्ये आपले शिक्षण झाले, त्या जिल्हा परिषद शाळा, वाठार निंबाळकर, जिल्हा परिषद शाळा, जुनागाव आणि वाठार हायस्कूल येथील स्वातंत्र्यदिनाच्या कार्यक्रमात माजी विद्यार्थी सहभागी झाले.

यावेळी २००७ च्या बॅचमार्फत या शाळांमधील सुमारे २५० विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले. यामध्ये इयत्ता १ ली ते ४ थी साठी स्केच पेन किट, ५ वी ते ७ वी साठी नटराज किट आणि ८ वी ते १० वीच्या विद्यार्थ्यांसाठी कंपास किटचे वाटप करण्यात आले.

या अविस्मरणीय कार्यक्रमासाठी बॅचमधील सर्व माजी विद्यार्थ्यांनी आर्थिक सहकार्य केले होते. आपल्या एकीची ही ताकद यापुढेही कायम राहो, अशी भावना यावेळी आयोजकांनी व्यक्त केली.


Back to top button
Don`t copy text!