दैनिक स्थैर्य । दि.३१ जानेवारी २०२२ । सातारा । कोरोना महामारीमुळे सुमारे दोन महिन्यांपासून वासोटा पर्यटन बंद होते. त्यामुळे बामणोली परिसरातील बोट मालक, चालक आणि इतर व्यावसायिकांवर उपासमारीची वेळ आली होती. दरम्यान, सोमवारी आ. श्रीमंत छ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी वनसंरक्षक (वन्यजीव) समाधान चव्हाण यांच्याशी संपर्क साधून वासोटा पर्यटन, बोटिंग त्वरित पूर्ववत सुरु करण्याचीसूचना केली. यांनतर चव्हाण यांनी मंगळवार दि. १ फेब्रुवारीपासून वासोटा पर्यटन सुरु करण्याचा निर्णय घेतला.
वासोटा पर्यटन आणि बोटिंग बंद असल्याने सुमारे दोन महिन्यांपासून बामणोली परिसरातील बोट मालक, चालक आणि पर्यटनाशी निगडित सर्वच व्यावसायिकांवर उपासमारीची वेळ आली होती. वासोटा पर्यटन आणि बोटिंग पूर्ववत सुरु व्हावे यासाठी भैरवनाथ बोट क्लबच्या पदाधिकाऱ्यांनी आ. शिवेंद्रसिंहराजे यांची भेट घेतली आणि वासोटा पर्यटन आणि बोटिंग सुरु करून देण्याची मागणी केली. यावेळी भैरवनाथ बोट क्लबचे अध्यक्ष धनाजी संकपाळ, उपाध्यक्ष संजय शिंदकर, सचिव निलेश शिंदे, सुभाष शिंदकर, राजेंद्र संकपाळ, राजेंद्र कांबळे, गोविंद शिंदकर, किसन भोसले यांच्यासह सर्व पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते.
यासंदर्भात आ. शिवेंद्रसिंहराजे यांनी मोबाईलवरून वनसंरक्षक वन्य जीव (सह्याद्री व्याघ्र प्रकल्प) समाधान चव्हाण यांच्याशी संपर्क साधला. बामणोली भागातील बोटिंग आणि इतर व्यवसाय पर्यटनावर अवलंबून असतात. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर वासोटा पर्यटन बंद ठेवण्यात आले आहे. महाबळेश्वरमध्ये पर्यटन सुरु आहे. सर्व ठिकाणी सर्वकाही सुरु असताना कोरोनाचे कारण दाखवून वासोटा पर्यटन बंद ठेवणे म्हणजे बामणोली परिसरातील बोट चालक, मालक आणि पर्यटनावर अवलंबून असणाऱ्या इतर सर्व व्यावसायिकांवर अन्याय करणे आहे. त्यामुळे किल्ले वासोटा पर्यटनासाठी त्वरित परवानगी द्या, अशा सूचना आ. शिवेंद्रसिंहराजे यांनी चव्हाण यांना दिल्या. यानंतर चव्हाण यांनी उद्यापासून (मंगळवार) किल्ले वासोटा पर्यटन सुरु करण्यास परवानगी देत असल्याचे सांगितले. यांनतर आ. शिवेंद्रसिंहराजे यांनी जिल्हाधिकारी शेखर सिंह यांच्याशीही संपर्क साधून वासोटा पर्यटन आणि बोटिंग उद्यापासून सुरु होत असून महसूल विभागाने व्यावसायिकांना सहकार्य करावे, असे सांगितले. शेखर सिंह यांनीही सकारात्मक प्रतिसाद दिला त्यामुळे मंगळवारपासून किल्ले वासोटा पर्यटन आणि बोटिंग पुन्हा सुरु होण्याचा मार्ग मोकळा झाला. याबद्दल उपस्थित पदाधिकारी सर्व बोट चालक, मालक आणि ग्रामस्थांनी समाधान व्यक्त करून आ. शिवेंद्रसिंहराजेंचे आभार मानले.