स्थैर्य,वसई,दि ११: शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ, असं म्हणतात. हे प्रत्यक्षात आणलं ते वसईतील एका महिलेनं. एटीएममध्ये चोरी करण्यासाठी घुसलेल्या चोराला तिनं बळाचा नाही तर डोक्याचा वापर करून पकडून दिलं आहे. या महिलेचं सर्वत्र कौतुक होत आहे. सुलभा पवार असं या धाडसी आणि हुश्शार महिलेचं नाव आहे.
फादरवाडी परिसरातील ही घटना. एका बँकेच्या एटीएममध्ये चोर घुसला. त्याने एटीएम तोडून पैसे लुटण्याचा प्रयत्न केला. हे एटीएम जिथं आहे, तिथंच शेजारी सुलभा पवार राहता. एटीएममध्ये चोर घुसला आहे, हे त्यांच्या लक्षात आलं. दुसरं तिसरं कुणी असतं तर थेट पोलिसांना फोन केला असता. पण कदाचित तोपर्यंत चोरटा फरारही झाला असता. पण सुलभा पवार यांना जेव्हा एटीएममध्ये चोरी होत असल्याचं दिसलं तेव्हा त्या स्वतः सर्वात आधी एटीएमजवळ आल्या. त्यांनी एटीएमच्या काचेतून डोकावून पाहिलं. तो चोरच होता. एटीएम फोडून पैसे काढण्यासाठी त्याची धडपड सुरू होती.
दुसरी एखादी निर्भीड व्यक्ती आली असती आणि तिनं एटीएममध्ये घुसून त्या चोरट्याला थांबवण्याचा प्रयत्न केला असता. पण सुलभा पवार यांनी डोकं लढवलं. त्यांनी चोरट्याला बळाचा वापर करून नाही तर डोक्याचा वापर करून चोरी करण्यापासून रोखलं. त्यांनी मोठ्या चलाखीनं एटीएमचं शटर बंद केलं आणि त्याला बाहेरून कुलूप लावलं. त्यानंतर त्यांनी स्थानिकांना बोलावलं आणि स्थानिकांनी याबाबत पोलिसांना माहिती दिली.
पोलिसांना माहिती मिळताच ते तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी शटर उघडलं. चोरटा आतच होता. त्याने एटीएमची तोडफोडही केली होती. पण त्यातील पैसे चोरण्यात त्याला काही यश आलं नाही. पोलिसांनी त्याला बेड्या ठोकल्या, असं वृत्त एबीपीनं दिलं आहे. सुलभा पवार यांच्या सतर्कतेमुळे चोरटा रंगेहाथ पकडला गेला. त्यांच्या या धाडसाचं आणि हुशारीला सर्वांनी दाद दिली आहे. त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होतो आहे.