वर्णे-आबापुरीची काळभैरवनाथ यात्रेस 13 मार्चपासून प्रारंभ

हरी जागराने होणार सुरुवात; देवस्थान प्रशासनाकडून जय्यत तयारी


स्थैर्य, 8 मार्च, सातारा – जिल्ह्यातील मोठ्या यात्रांपैकी एक असलेल्या वर्णे-आबापुरी, ता. सातारा येथील श्री काळभैरवनाथ यात्रेस शुक्रवार, दि. 13 रोजी रात्री हरी जागराने सुरुवात होणार आहे. ही यात्रा गुरुवार, दि. 19 पर्यंत होणार आहे. या यात्रेस संपूर्ण महाराष्ट्रातून लाखो भाविक येतात.

यात्रेच्या नियोजनासाठी काळभैरव देवस्थान ट्रस्ट, वर्णे ग्रामपंचायत व विविध विभागांसमवेत होणार आहे. यात्रेस शुक्रवारी (दि. 13) रात्री 12 वाजता काळभैरवनाथ मंदिरात हरी जागराने सुरुवात होईल. खडावा परिधान करण्याचा कार्यक्रम रात्री 2 वाजता होईल.

देवस्थानचे शिवकळा अधिकारी या धारधार खडावा परिधान करतात. हा सोहळा यात्रेकरू व भाविकांसाठी भावनिक आणि आकर्षणाचा विषय ठरतो. यासाठी मोठी गर्दी होते. यात्रेचा मुख्य दिवस शनिवारी (दि. 14) असून, दुपारी 12 वाजता देवाचा छबिना लवाजम्यासह डोंगरावरील मंदिरात जाईल. तेथे भाविकांच्या प्रश्नांची सोडवणूक करण्याची प्रथा आहे. त्यानंतर सायंकाळी 5 वाजता पालखी, छबिना आपल्या बहिणी जानाई, भवानीमाता यांना भेटायला वर्णे गावात जाणार आहे. रविवारी (दि. 15) पहाटे 5 वाजून 18 मिनिटांनी गोपाळ मुहूर्तावर श्रीयांचा विवाह सोहळा होणार आहे. यात्रा स्थळावरील वाहतुकीचे नियोजन बोरगावचे सपोनि प्रशांत हुले, पोलीस अधिकारी, कर्मचारी आणि जादा कुमक यांच्या माध्यमातून होईल. रविवारी दुपारी कुस्त्यांचा आखाडा होणार आहे. सोमवारी (दि. 16) दुपारी 12 वाजता पाकाळणी व सायंकाळी 7 वाजता गोंधळ, आरती होऊन यात्रेची सांगता होणार आहे. ही यात्रा गुढीपाडव्यापर्यंत होणार आहे. भक्तांनी यात्रेत सहभागी होऊन, शोभा वाढवावी, असे आवाहन देवस्थानचे अध्यक्ष भाऊसाहेब पवार व विश्वस्तांनी केले आहे.

या यात्रेसाठी येणारे भाविक त्यांच्याकडे उपलब्ध असलेल्या कॅलेंडर्समधील तारखा पाहूनच येतात; परंतु यावर्षीच्या सर्व कॅलेंडर्समध्ये अनावधानाने यात्रेचा मुख्य दिवस शुक्रवार दि. 13 मार्च असल्याचे छापले गेले आहे. मात्र, पंचांगानुसार शनिवारी (दि. 14) यात्रेचा मुख्य दिवस आहे. त्यामुळे भाविकांनी गोंधळून न जाता, योग्य नियोजन करून यात्रेस यावे, असे आवाहन काळभैरव देवस्थान ट्रस्टच्यावतीने करण्यात आले आहे.


Back to top button
Don`t copy text!