सातार्‍यात मराठी भाषा पंधरवड्यानिमित्त शुक्रवारपासून विविध कार्यक्रम


स्थैर्य, 25 फेब्रुवारी, सातारा : राज्यातील पहिला मराठी भाषा पंधरवडा मसाप, शाहुपुरी शाखा आणि सातारा नगरपालिकेच्यावतीने सुरु करण्यात आला. यंदा या मराठी भाषा पंधरवड्याचे 15 वे वर्ष असून शुक्रवार 27 फेब्रुवारी ते सोमवार 16 मार्च 2026 या कालावधीत विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आल्याची माहिती मसाप, शाहुपुरी शाखेचे अध्यक्ष नंदकुमार सावंत यांनी प्रसिध्दीपत्रकाव्दारे दिली.

सातार्‍यात साहित्यिक चळवळीत महत्वाचे योगदान देणार्‍या मसाप, शाहुपुरी शाखेच्यावतीने 15 वर्षापूर्वी सातारा नगरपालिकेच्या सहकार्याने राज्यातील मराठी पहिला मराठी भाषा पंधरवडा सुरु करण्यात आला. कवी कुसुमाग्रज यांची जयंती आणि वि.दा.करंदीकर यांचा स्मृतीदिनाचे औचित्य साधून या कालावधीत विविध कार्यक्रम घेतले जातात. यंदाचे 15 वर्ष असून त्याचा प्रारंभ शुक्रवार मराठी राजभाषा दिन म्हणजेच दि. 27 फेब्रुवारी 2026 रोजी सायंकाळी 6 वाजता पाठक हॉल येथे होणार आहे.

मराठी भाषा पंधरवड्याचे उद्घाटनानिमित्त ज्येष्ठ कवी नारायण सुर्वे यांच्या जन्मशताब्दीचे औचित्य साधूर प्रसिध्द कवी, लेखक प्रा. इंद्रजित भालेराव यांचे ’नारायण सुर्वे- माणूस’ या विषयावर व्याख्यान होणार आहे. यावेळी सातारा नगरपालिकेचे नगराध्यक्ष अमोल मोहिते, उपनगराध्यक्ष अ‍ॅड.डी.जी. बनकर, सातारा पालिकेचे नियोजन, विकास सभापती अशोक शेडगे, दै. प्रभातचे निवासी संपादक श्रीकांत कात्रे यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे.
दुसरा कार्यक्रम रविवार दि.1 मार्च रोजी सकाळी 9.30 वाजता नगरवाचनालयाच्या पाठक हॉल येथे होणार आहे. सकाळी 9.30 ते 1 यावेळेत कादंबरी लेखन कार्यशाळा होणार असून ज्येष्ठ कादंबरीकार डॉ.श्री.बाळासाहेब लबडे हे कादंबरी विषयक मार्गदर्शन करणार आहेत. या कार्यशाळेसाठी नावनोंदणी आवश्यक असून प्रवेश मर्यादित आहेत. या कार्यशाळेस सातारा नगरपालिकेच्या महिला, बालकल्याण सभापती सौ.मोनिका घोरपडे, उपसभापती सौ.सुजाता गिरीगोसावी, अश्वमेध परिवाराचे संस्थापक अध्यक्ष रवींद्र भारती, ज्येष्ठ पत्रकार मुकुंद फडके, दै.लोकमतचे संपादकीय प्रमुख हणमंत पाटील यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे.

सोमवार दि.2 मार्च रोजी सकाळी 10 वाजता मराठी भाषा पंधरवड्यातंर्गत मी मराठी-स्वाक्षरी मराठी अभियानाचा प्रारंभ करण्यात येणार आहे. राजवाडा, गोलबाग येथे होणार्‍या या अभियानाचा प्रारंभ सातार पालिकेचे नगराध्यक्ष अमोल मोहिते यांच्या हस्ते होणार आहे. यावेळी सातारा पालिकेचे मुख्याधिकारी अभिजित बापट, उपनगराध्यक्ष अ‍ॅड.डी.जी. बनकर, ज्येष्ठ पत्रकार, साहित्यिक श्रीनिवास वारुंजीकर, दै.सकाळचे सहयोगी संपादक राजेश सोळस्कर यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे.

सोमवार दि.9 मार्च रोजी सायंकाळी 6 वाजता शाहूकला मंदिर येथे हिंदी मराठी चित्रपट संगीत अभ्यासक विशेषज्ञ, लेखिका डॉ. मुदुला दाढे यांचा ’….तर असेल गीत हे !’ हा कार्यक्रम होणार आहे. यावेळी त्या नामवंत संगीतकार श्रीनिवास खळे, सुधीर फडके, पंडित ह्दयनाथ मंगेशकर, अशोक पत्की यांच्या रचना उलगडून दाखवणारे सप्रयोग व्याख्यान डॉ. दाढे देणार आहेत. यावेळी खा.श्री.छ. उदयनराजे भोसले, सार्वजनिक बांधकाम मंत्री श्री.छ. शिवेंद्रसिंहराजे भोसले, सातारा पालिकेचे नगराध्यक्ष अमोल मोहिते, उपनगराध्यक्ष अ‍ॅड.डी.जी. बनकर हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. तर सातारा नगरपालिकेचे गटनेता अविनाश कदम, नगरसेवक मनोज शेंडे, पुणे विभागीय अधिस्वीकृती समितीचे अध्यक्ष हरिष पाटणे यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे.

गुरुवार दि. 13 मार्च रोजी सायंकाळी 6 वाजता श्री.छ. प्रतापसिंह महाराज (थोरले) नगरवाचनालय यांच्या विशेष सहकार्याने सुप्रसिध्द एकपात्री कलाकार, हास्यकवी बंडा जोशी यांचा ’हास्यपंचमी’ एकपात्री कार्यक्रम पाठक हॉल येथे होणार आहे. यावेळी सातारा पालिकेचे आरोग्य सभापती धनंजय जांभळे, शिक्षक, क्रीडा व सांस्कृतिक कार्य सभापती शंकर कीर्दत, सार्वजनिक बांधकाम सभापती बाळासाहेब खंदारे, प्रसिध्द लेखक डॉ.संदीप श्रोत्री, नगरवाचनालयाचे अध्यक्ष अमित कुलकर्णी यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे.

मराठी भाषा पंधरवड्याचा समारोप सोमवार दि.16 मार्च रोजी सायंकाळी 6 वाजता पाठक हॉल येथे होणार आहे. बार्शी येथील विहिरीची मुलगी व पाळी पॉलिटिक्स या गाजलेल्या पुस्तकांच्या लेखिका स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ. ऐश्वर्या रेवडकर यांचे ’मी आणि माझे लेखन’ या विषयावर व्याख्यान होणार आहे. यावेळी सातारा पालिकेचे मुख्याधिकारी अभिजित बापट, दुर्बल घटक सभापती संकेत साठे, आम्ही पुस्तकप्रेमी समूह प्रतिनिधी श्रीराम नानल, मसाप,पुणे कार्यवाह शिरीष चिटणीस, मसाप,पुणे सातारा जिल्हा प्रतिनिधी रवींद्र बेडकिहाळ यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे.

मराठी भाषा पंधरवड्यांच्या या सर्व कार्यक्रमांना साहित्यप्रेमी, रसिकांनी मोठया संख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन, मसाप, शाहुपुरी शाखेचे अध्यक्ष नंदकुमार सावंत, कार्याध्यक्ष अ‍ॅड. चंद्रकांत बेबले, उपाध्यक्ष विक्रम पाटील, प्रमुख कार्यवाह अजित साळुंखे, कार्यवाह संजय माने, कोषाध्यक्ष सचिन सावंत, सदस्य किशोर बेडकिहाळ, डॉ.उमेश करंबेळकर, वजीर नदाफ, आर.डी.पाटील, अमर बेंद्रे, सौ. ज्योती कुलकर्णी, सौ.अश्विनी जठार, निमंत्रित सदस्य डॉ.राजेंद्र माने यांनी केले आहे.


Back to top button
Don`t copy text!