माता रमाई आंबेडकर यांच्या शतकोत्तर रौप्य महोत्सवी जन्म वर्षानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करावे – शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य । दि. ०२ फेब्रुवारी २०२३ । मुंबई । माता रमाई भीमराव आंबेडकर यांच्या 7 फेब्रुवारी रोजीच्या जयंती निमित्त रत्नागिरी जिल्ह्यातील वणंद या त्यांच्या जन्मस्थानी आयोजित कार्यक्रमास जिल्हाधिकारी कार्यालय तसेच सामाजिक न्याय विभागामार्फत संपूर्ण सहकार्य करण्यात यावे. त्याचप्रमाणे माता रमाई यांच्या शतकोत्तर रौप्य महोत्सवी जन्म वर्षानिमित्त राज्यात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात यावे, अशी सूचना शालेय शिक्षण मंत्री तथा मुंबई शहर जिल्ह्याचे पालकमंत्री दीपक केसरकर यांनी केली.

चालू वर्ष हे माता रमाई आंबेडकर यांचे शतकोत्तर रौप्य महोत्सवी जन्मवर्ष आहे. यानिमित्त शासनाच्या वतीने राज्यात सामाजिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात यावे, या विविध सामाजिक संघटनांनी केलेल्या मागणीबाबत श्री.केसरकर यांच्या अध्यक्षतेखाली बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीस सामाजिक न्याय विभागाचे सचिव सुमंत भांगे, डॉ.बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी) चे महासंचालक धम्मज्योती गजभिये, रत्नागिरीचे जिल्हाधिकारी एम.देवेंदर सिंह यांच्यासह बृहन्मुंबई महानगरपालिका, पोलीस, परिवहन, बेस्ट आदी विभागांचे वरिष्ठ अधिकारी तसेच विविध सामाजिक संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

पालकमंत्री श्री.केसरकर म्हणाले, रत्नागिरी जिल्ह्यातील वणंद येथील माता रमाई यांच्या स्मारकाचे अद्ययावतीकरण करून तेथे येणाऱ्या अनुयायांना जिल्हा प्रशासनामार्फत सोयी सुविधा उपलब्ध करून द्याव्यात. यासाठी सामाजिक न्याय विभागाने सहकार्य करावे. मुंबईत माता रमाई यांच्या वरळी येथील स्मारक परिसरात कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येऊन तेथे बृहन्मुंबई महानगरपालिकेमार्फत सोयी सुविधा उपलब्ध करून देण्यात याव्यात. चैत्यभूमी जवळील दर्शक दिघेचे (व्ह्युविंग डेक) सुशोभिकरण करण्यात यावे. शाळांमधून वर्षभर माता रमाई यांच्याशी संबंधित विविध कार्यक्रम आणि स्पर्धांचे आयोजन करण्यात यावे. यासाठी संबंधित विभागांनी समन्वयाने काम करावे, असे आवाहन त्यांनी केले. रमाई आवास योजनेची व्याप्ती वाढविण्यासाठी तसेच विद्यार्थ्यांना परदेशात शिक्षण घेण्यासाठी देण्यात येणाऱ्या शिष्यवृत्तीमध्ये वाढ करण्यासाठी सामाजिक न्याय विभागाने प्रयत्न करावेत, अशी सूचनाही त्यांनी केली. चेंबूर येथील मुलींच्या शासकीय वसतिगृहाला माता रमाई यांचे नाव देण्याबाबत प्रस्ताव सादर करावा. तसेच भोईवाडा येथील बौद्ध पंचायत समिती कार्यालयाच्या जागेत अधिक सुविधा देण्याबाबत सामाजिक न्याय विभागाने पाहणी करावी, अशी सूचनाही श्री.केसरकर यांनी केली.

सचिव श्री.भांगे यांनी यावेळी सामाजिक न्याय विभागामार्फत राबविल्या जाणाऱ्या विविध योजनांची माहिती दिली. यावेळी भारतीय बौद्ध महासभा, रिपब्लीकन सेना, विश्वशांती सामाजिक संस्था, रमाई प्रतिष्ठान, ऑल इंडिया बँक फोरम, एचपीसीएल, रिपब्लीकन का.सेना, बौद्धजन पंचायत समिती आदी संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते.


Back to top button
Don`t copy text!