दैनिक स्थैर्य | दि. 10 डिसेंबर 2024 | गोखळी | फलटण तालुक्याच्या पूर्व भागातील शांतीदासनगर येथे सद्गुरु श्री शांतीदास महाराज पुण्यतिथी व श्री दत्त जयंतीनिमित्त दि. ८ डिसेंबरपासून विविध धार्मिक कार्यक्रमांबरोबरच स्वदेशी शिल्प कला-कौशल्य प्रदर्शन ‘स्वदेशी मेला’, बैलगाडा शर्यत, कुस्त्यांचे मैदान, भव्य खुली भजन स्पर्धा, भव्य श्वान शर्यत आणि श्री सद्गुरू चरित्र पारायण आणि ज्ञानेश्वरी पारायण कीर्तन सप्ताह आदी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती संयोजकांनी दिली.
शांतीदासनगर (गोखळी) येथील श्री सद्गुरू शांतीदास महाराज पुण्यतिथी व श्री दत्तजयंती सोहळ्याचे यंदा ४७ वे वर्षे असून यंदा प्रथमच स्वदेशी शिल्प कलाकौशल्य प्रदर्शनाचे उद्धाटन सौ. शिवगंगा व गुलाबदादा घुले, सौ. नीलम पवार, डॉ. ज्ञानेश्वर पवार यांच्या उपस्थितीत दि. १३ डिसेंबर रोजी दुपारी ३ वाजता होणार आहे.
भव्य शेतकरी मेळावा आणि कृषी प्रवचन दि. १४ डिसेंबर रोजी होणार असून मार्गदर्शक मानाजी गावडे सर यांचे सायंकाळी ५ ते ७ यावेळेत मार्गदर्शन होणार आहे.
रविवार, दि. ८ डिसेंबरपासून अखंड हरिनाम सप्ताह व श्री ज्ञानेश्वरी पारायण, गुरुचरित्र पारायण सोहळ्याच्या पहिल्या दिवशी भागवताचार्य ह.भ.प. कु. वैष्णवी धायगुडे (काझड), दि. ९ डिसेंबर रोजी भागवताचार्य ह.भ.प. लक्ष्मण महाराज देवकर (आळंदी), दि.१० डिसेंबर रोजी संत तुकाराम महाराज यांचे १० वंशज ह.भ.प. पुंडलिक महाराज देहूकर, दि.११ डिसेंबर रोजी ह.भ.प. चैतन्य महाराज बारवकर (निमगाव-केतकी), दि. १२ डिसेंबर रोजी भागवताचार्य ह.भ.प. सौ. राणीताई सिध्दवाडकर, दि. १३ डिसेंबर रोजी ह.भ.प. अजय शिंदे महाराज (करकंब), दि. १४ डिसेंबर रोजी ह.भ.प. कीर्तन केसरी ह.भ.प. पुंडलिक महाराज नागवडे, दि. १५ डिसेंबर रोजी सकाळी ९ ते ११ काल्याचे किर्तन ह.भ.प. शिवचंद्र महाराज शेळके (बुलढाणा) यांचे होणार आहे.
सर्व दैनंदिन कार्यक्रमांमध्ये दररोज पहाटे काकडा, सकाळी ७ ते १० ज्ञानेश्वरी पारायण वाचन, सायंकाळी ५ ते ६ हरिपाठ, सायंकाळी ७ ते ९ किर्तनास आलेल्या श्रोते वर्गासाठी “माऊली चाले कोणा संगे” लकी ड्रॉ यामध्ये विजेत्यांना संत ज्ञानेश्वर, विठ्ठल रुक्मिणी मूर्ती, सद्गुरु गोंदवलेकर महाराज प्रतिमा, सद्गुरु शांतीदास महाराज प्रतिमा, संत ज्ञानेश्वर महाराज प्रतिमा अशी बक्षिसे ठेवण्यात आली आहेत.
महाप्रसाद दि. १७ डिसेंबर रोजी होणार असून यावेळी महिलांसाठी कृष्णा अष्टेकर ज्वेलर्स बारामती आयोजित ‘होम मिनिस्टर’ कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.