गोपाळनाथ महाराजांच्या पुण्यतिथीनिमित्त त्रिपुटीत शुक्रवारपासून विविध कार्यक्रमांचे आयोजन


स्थैर्य, सातारा, दि. 13 ऑगस्ट : श्री क्षेत्र त्रिपुटी (ता. कोरेगाव) येथे प्रतिवर्षाप्रमाणे गुरुवर्य अण्णासाहेब महाराज प्रवर्तित श्री सद्गुरू परब्रह्म गोपाळनाथ महाराजांचा 259 वा पुण्यतिथी महोत्सव शुक्रवारपासून (ता. 15) सोमवारअखेर (ता. 25) दररोज विविध कार्यक्रमांनी साजरा होणार आहे.

महोत्सवात शुक्रवारी (ता. 15) रात्री दहा वाजता श्री क्षेत्र त्रिपुटी संस्थानचे मठाधिपती गुरुनाथ महाराज घोलप यांचे श्रीकृष्ण व श्री गोपाळनाथ जन्मोत्सवावर कीर्तन होणार आहे. 16 रोजी सायंकाळी सात वाजता तुकाराम महाराज निकम (काळोशी), त्यानंतर गोरख महाराज रायते (पंढरपूर), महंत 1008 मौनीबाबा प्रभाणिकर (ब्रह्मशक्ती पीठ, परभणी), परशुराम महाराज वाघ (मठाधिपती, कार्तिकस्वामी संस्थान, देवदरी), चैतन्य महाराज निंबोळे (नाशिक), उमेश महाराज किर्दत (चिंचनेर निंब), अनिल महाराज तुपे (नाशिक) यांचे कीर्तन होणार आहे.

महोत्सवाचा मुख्य दिवस 23 ऑगस्ट असून, या दिवशी सकाळी सात ते नऊ या वेळेत भजन दिंडी, उंब्रज, कोरटी व भोसलेवाडी (ता. कर्‍हाड) येथील मानाच्या ध्वजांचे आगमन, श्रीनाथ समाधीस महाभिषेक होईल. दहा वाजता पुस्तक प्रकाशन समारंभ होईल. 11 वाजता श्रीनाथ समाधी प्रसंगावर सुरेश महाराज साखवळकर (तळेगाव दाभाडे, पुणे) यांचे कीर्तन, श्रीनाथ समाधीवर गुलाबपुष्प अर्पण कार्यक्रम होईल. दुपारी एक वाजता पालखी ग्रामप्रदक्षिणा प्रस्थान होईल. सायंकाळी पाच वाजता महाप्रसाद (सर्व नाथ भक्त- त्रिपुटी ग्रामस्थ), रात्रभर एकतारी भजनाचा कार्यक्रम होईल.

ता. 24 रोजी सकाळी दहा वाजता कविवर्य हैबतीबुवा घाटगे, पुसेसावळी स्मृती, भेदिक आध्यात्मिक काव्यगायन, संत शेख सुलतान स्मृती यांच्यावतीने खिचडी नैवेद्य होईल. सायंकाळी पाचनंतर गोपाळकाला खेळ, ग्रामस्थ मंडळ त्रिपुटी व दहीहंडी कार्यक्रम होईल. 25 रोजी सकाळी प्रसादाचे कीर्तन मधुकर महाराज दीक्षित (मसूर) यांचे होईल.


Back to top button
Don`t copy text!