
सातारा – शिवजयंतीनिमित्त शिवरायांना मदत करणारे अष्टप्रधान मंडळ व त्यांचे मावळे यांच्या विषयी माहिती देणारे फलक सातारकरांचे लक्ष वेधून घेत आहे. (छाया – अतुल देशपांडे)
स्थैर्य, 17 फेब्रुवारी, सातारा : शिवजयंती निमित्त सातारा येथे शिवजयंती महोत्सव समिती सातारा यांच्या वतीने विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. बुधवार दि. 18 रोजी सायंकाळी 5 वाजता किल्ले अजिंक्यतारा येथे गडपूजन व भव्य मशाल महोत्सव होणार आहे.
गुरुवार दि. 19 रोजी सायंकाळी 5 वाजता शिवप्रतिमेचे गांधी मैदान ते पोवई नाका अशी भव्य मिरवणूक काढण्यात येणार आहे. या मिरवणुकीत हाती, घोडे, उंट, विविध चित्ररथ यासह महाकाल उज्जैन येथील प्रसिद्ध वाद्य, अघोरी नृत्य यांचा समावेश असणार आहे. रात्री 8 वाजता शिवतीर्थ पोवई नाका येथे खा. श्रीमंत छ. उदयनराजे भोसले व ना. श्रीमंत छ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या हस्ते शिवरायांची महाआरती होणार आहे. यावेळी फटाक्यांची जोरदार आतिषबाजी होणार आहे. तसेच यावेळी शिवतीर्थ येथील छ. शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याची उंची वाढवणे या कामाचे भूमिपूजन केले जाणार आहे. शिवजयंती निमित्त आयोजित सर्व कार्यक्रमांना सर्व आजी माजी पदाधिकारी, सर्व आजी माजी नगरसेवक, सर्व कार्यकर्ते आणि नागरिकांनी उपस्थित राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
