
दैनिक स्थैर्य । 12 एप्रिल 2025। फलटण । भगवान महावीर जयंतीनिमित्त जैन समाजाच्यावतीने चांदीचा रथ व चित्र रथासह शहरातील प्रमुख मार्गावरुन भव्य शोभा यात्रा काढण्यात आली.
शोभायात्रेत अग्रभागी पालखी त्यामध्ये भगवान महावीर यांची प्रतिमा, त्यामागे चांदीच्या रथामध्ये भगवान विराजमान होते, तर त्या पाठीमागे 3 चित्र रथामध्ये एकावर आचार्य शांतीसागर महाराज यांची प्रतिमा, एकावर भगवान बाहुबलींची प्रतिमा विराजमान करण्यात आली.
शोभा यात्रेसमोर समाजातील महिला मुलींचे लेझीम पथक, मुला मुलींचे झांज पथक व अन्य मंगल वाद्य होती.
ही शोभायात्रा आदिनाथ मंदिर – शुक्रवार चौक – शंकर मार्केट – छ. शिवाजी वाचनालय – पाचबत्ती चौक – बारामती चौक – छ. शिवाजी महाराज चौक – डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक या मार्गाने शोभायात्रा भगवान महावीर स्तंभ येथे पोहोचल्यावर मान्यवरांच्या हस्ते भगवान महावीरांच्या प्रतिमेस पुष्पहार घालुन अभिवादन करण्यात आले. त्यानंतर शोभा यात्रा डेक्कन चौक, म. फुले चौक, भगवान चंद्रप्रभू मंदिर मारवाड पेठ, बारस्कर चौक या मार्गाने आदिनाथ मंदिर येथे पोहोचल्यावर विसर्जित करण्यात आली.
यावेळी आ. श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर, आ. सचिन पाटील, नगर परिषदेतील माजी विरोधी पक्ष नेते समशेर बहाद्दर नाईक निंबाळकर, पोलिस निरीक्षक हेमंतकुमार शहा, मिलिंद नेवसे, कृष्णाथ उर्फ दादासाहेब चोरमले आदींनी पुष्पहार घालून अभिवादन केले.
मिरवणुकीनंतर जैन सोशल ग्रुप फलटण व मेडिकल फौंडेशन यांच्या संयुक्त सहभागाने आयोजित रक्तदान शिबिरात 51 रक्तदात्यांनी रक्तदान केले. जैन सोशल ग्रुप मार्फत निबंध व चित्रकला स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. विजेत्यांना सन्मान चिन्ह देऊन मान्यवरांच्या हस्ते गौरव करण्यात आला. यशवंत बाबा गोपालन संस्थेत जैन सोशल ग्रुप व संगिनी फोरमच्यावतीने कलिंगड, गोळी पेंड, भुस्सा व चार्याचे वाटप करण्यात आले. महात्मा शिक्षण संस्था संचलित मूकबधिर विद्यालया येथे विद्यार्थ्यांना खरबुज वाटप करण्यात आले. एसटी बसस्थानकावर प्रवाशांना सरबत वाटप करण्यात आले. शोभा यात्रेतील श्रावक श्राविकांना पाणी वाटप करण्यात आले.
या महोत्सवाचे आदिनाथ युवक संघ, अहिंसा युवक कमिटी, चंद्रप्रभू युवक कमिटी, श्री सन्मती सेवा दल, जैन सोशल ग्रुप, संगिनी फोरम यांनी नियोजन केले होते.