दैनिक स्थैर्य | दि. २१ एप्रिल २०२३ | फलटण | फलटणचे ग्रामदैवत श्री काळभैरवनाथ व माता जोगेश्वरी यात्रेनिमित्त प्रतिवर्षीप्रमाणे विविध कार्यक्रम आयोजित करण्यात येतात. श्री काळभैरवनाथ माता जोगेश्वरी यात्रा ही तिथीप्रमाणे अक्षय तृतीया मुहूर्तावर संपन्न होत असते. यावर्षी फलटण येथे साजरी होणारी शिवजयंती या पार्श्वभूमीवर प्रशासनाने उद्या शनिवार, दि.२२ रोजी सकाळी १० ते दुपारी १२ यावेळेत श्री काळभैरवनाथ माता जोगेश्वरी विवाह सोहळा पार पाडण्याची लेखी परवानगी दिलेली आहे, तरी सर्व भाविकांनी याची नोंद घेऊन विवाह सोहळ्यास उपस्थित रहावे असे आवाहन श्री भैरवदेव देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष अँड.अशोकराव जाधव, उपाध्यक्ष श्री.प्रदीप पवार व विश्वस्तांनी केले आहे.
प्रतिवर्षी श्री काळभैरवनाथ माता जोगेश्वरी विवाह सोहळा हा मोठ्या थाटामाटा मध्ये संपन्न होत असतो. यावर्षी सुद्धा हा विवाह सोहळा मोठ्या उत्साहाच्या वातावरणामध्ये संपन्न होणार आहे. फलटण येथे शिवजयंती महोत्सवाचे आयोजन असल्यामुळे शनिवार, दि.२२ रोजी फलटणचे ग्रामदैवत श्री काळभैरवनाथ माता जोगेश्वरी पालखी सोहळा भैरोबा गल्ली, फलटण येथून निघून मुधोजी महाविद्यालय, फलटण परिसरामध्ये असणाऱ्या नाथाच्या ओठ्या जवळ देवाचा विवाह सोहळा संपन्न होणार आहे, असेही ट्रस्टचे अध्यक्ष अँड.अशोकराव जाधव, उपाध्यक्ष श्री.प्रदीप पवार व विश्वस्त मंडळाने स्पष्ट केले आहे.
श्री भैरवनाथ माता जोगेश्वरी यात्रा कार्यक्रम खालीलप्रमाणे शुक्रवार, दिनांक २१ रोजी सायं.०७ वाजता हळदी समारंभ, शनिवार, दिनांक २२ रोजी सकाळी १० ते दुपारी १२ पर्यंत पालखी मिरवणूक व विवाह सोहळा, रविवार, दि.२३ रोजी सायं.०६ ते रात्रौ १० वाजेपर्यंत श्री काळभैरवनाथ व माता जोगेश्वरी यांची पालखीतून नगर प्रदक्षिणा (छबिना), सोमवार, दिनांक २४ रोजी दुपारी १२:३० ते ०२ वाजेपर्यंत अँड.मिलिंद लाटकर यांच्या वतीने यात्रेनिमित्त महाप्रसाद, सायं.०७ वाजता पाकळणी, देवाची आरती होऊन यात्रेची सांगता होणार आहे.