दैनिक स्थैर्य | दि. २६ नोव्हेंबर २०२३ | फलटण |
भांडवलशाहीच्या विरोधात सहकार क्षेत्र निर्माण झाले. सध्या भारतात वाढत असलेल्या खाजगीकरणात सहकार क्षेत्राचा मोठा आधार असून गाव पातळीवर काम करणार्या विविध कार्यकारी सहकारी सेवा संस्था याच खर्या ग्रामीण विकासाचा कणा आहेत. या संस्था सक्षम करण्यासाठी ग्रामीण भागातील सर्व नागरिक सहकार साक्षर करणे गरजेचे असल्याचे सहकार अभ्यासक प्रा. सतीश जंगम यांनी सांगितले.
सातारा जिल्हा मध्यवर्ती बँक फलटण विभागीय कार्यालयाच्या वतीने सहकार सप्ताहाच्या निमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या सहकार मेळाव्यात प्रा. सतीश जंगम बोलत होते. अध्यक्षस्थानी सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक श्रीमंत शिवरूपराजे खर्डेकर होते. यावेळी सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या फलटण विभागाचे प्रमुख अजित निंबाळकर, सीए नागेश साळुंखे व श्री. खलाटे यांची प्रमुख उपस्थिती होती.
प्रा. सतीश जंगम म्हणाले, सध्या आपण सतरावा सहकार सप्ताह साजरा करीत आहोत. १८४४ साली इंग्लंडमध्ये सुरू झालेली ही सहकार चळवळ संपूर्ण जगभर पसरली असून सहकाराच्या माध्यमातूनच खर्या अर्थाने सर्वसामान्य व्यक्तीचा, समाजाचा आणि प्रदेशाचा विकास होतो, असे सांगून महाराष्ट्र राज्यात पतपुरवठा करण्यासाठी तीन स्तरावर काम होत असून राज्यस्तरावर राज्य सहकारी बँक, जिल्हा स्तरावर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक आणि ग्रामीण स्तरावर प्राथमिक सहकारी संस्था काम करीत आहेत. या प्राथमिक संस्था सहकार चळवळीचा पाया असून ग्रामीण विकासाचा कणा असून सहकाराची चळवळ टिकवणे आणि ती वृद्धिंगत करणे यासाठी या प्राथमिक संस्थांनी पुढाकार घेण्याची गरज आहे. देशात एक लाख ४२८ प्राथमिक शेती संस्था असून त्यापैकी महाराष्ट्रात २०९६२ संस्था कार्यरत आहेत. सध्या २००२ चे सहकार धोरण राबविले जात असून नवीन धोरण तयार करण्याचे काम चालू आहे. सेवा संस्थाना जेनेरिक औषध दुकानांची परवानगी देण्याचे सरकारने ठरवले असून त्याचबरोबर या संस्थांचे संगणकीकरण, नागरिकांना ई-सेवा देणे, धान्य साठवणूक क्षमता निर्माण करणे असे उपक्रम राबवून संस्था १५२ प्रकारच्या वस्तू व सेवांचा व्यवसाय करून ग्रामीण विकास होऊ शकतो. त्यासाठी सहकारी संस्थेचे संचालक, पदाधिकारी आणि सभासदांची जबाबदारी वाढणार असून यासाठीच ग्रामीण भागातील सर्व सभासदांना सहकार शिक्षण दिले पाहिजे, असे प्रा. जंगम यांनी सांगून सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या कार्याची माहिती दिली.
यावेळी श्रीमंत शिवरूपराजे खर्डेकर यांनी सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या कार्याची माहिती देऊन प्राथमिक स्तरावरील सोसायटीने चांगले कार्य केल्यास जिल्हा मध्यवर्ती बँक सक्षम होऊन संपूर्ण जिल्ह्याला फायदा होईल, असे सांगितले.
सीए नागेश साळुंखे यांनी सहकारी सेवा संस्थांचे व्यवहार लेखन व आयकर विभाग याबाबतची माहिती दिली.
अजित निंबाळकर यांनी स्वागत व प्रास्ताविक केले तर श्री. खलाटे यांनी आभार मानले.कार्यक्रमास फलटण तालुक्यातील सर्व विविध कार्यकारी सहकारी सेवा संस्थांचे सचिव व पदाधिकारी उपस्थित होते.