फलटण शहरात रविवारी विविध विकासकामांचे उद्घाटन; श्रीमंत रामराजेंच्या जाहीर सभेचे आयोजन


स्थैर्य, फलटण, दि. १ नोव्हेंबर : फलटण शहरात रविवार, दिनांक २ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ५ वाजता विविध विकासकामांचे उद्घाटन आणि भूमिपूजन आमदार श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांच्या हस्ते होणार आहे. या कार्यक्रमानंतर शनिनगर बाग येथे त्यांच्या जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले असून, या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी आमदार दिपकराव चव्हाण असणार आहेत.

यावेळी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर प्राथमिक शाळा क्रमांक २ च्या नवीन इमारतीचे उद्घाटन, सभापती निवास ते संतोष वेलणकर घर रस्ता कामाचा शुभारंभ, तसेच नाबार्ड निधीतून बांधण्यात आलेल्या बाणगंगा नदीवरील दत्तघाट बॉक्सपुल आणि रिटेनिंग वॉलचे उद्घाटन होणार आहे.

कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती श्रीमंत रघुनाथराजे नाईक निंबाळकर, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर आणि माजी नगराध्यक्षा सौ. निताताई नेवसे उपस्थित राहणार असल्याची माहिती माजी नगरसेवक किशोरसिंह नाईक निंबाळकर व माजी नगरसेविका सौ. प्रगती भाऊसाहेब कापसे यांनी दिली.

उद्घाटन कार्यक्रमानंतर शनिनगर बाग येथे होणाऱ्या जाहीर सभेला राजकीय महत्त्व प्राप्त झाले आहे. गेली ३५ वर्षे फलटण नगर परिषदेची सत्ता श्रीमंत रामराजे यांच्या विचाराची राहिली असून, गेल्या ४ वर्षांपासून लांबलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लवकरच होण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर काय बोलणार याकडे फलटण शहरातील नागरिकांची उत्सुकता लागली आहे.


Back to top button
Don`t copy text!