
फलटण नगरपरिषदेच्या महिला व बालकल्याण समितीच्या वतीने जागतिक महिला दिनानिमित्त आज (दि. ३०) नगरपरिषद कार्यालयात महिलांसाठी सांस्कृतिक कार्यक्रम, आरोग्यविषयक मार्गदर्शन व ‘होम मिनिस्टर’ खेळाचे आयोजन करण्यात आले आहे.
स्थैर्य, फलटण, दि. ३० मार्च : ८ मार्च रोजीच्या जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून फलटण नगरपरिषद येथील ‘महिला व बालकल्याण समिती’च्या वतीने आज, सोमवार दि. ३० मार्च २०२६ रोजी दुपारी ३:०० वाजता खास महिलांसाठी विविध गुणदर्शन व सांस्कृतिक कार्यक्रमांचे भव्य आयोजन करण्यात आले आहे. हा रंगतदार कार्यक्रम फलटण नगरपरिषद कार्यालयात संपन्न होणार आहे.
‘होम मिनिस्टर’ आणि आरोग्यावर मार्गदर्शन:
या कार्यक्रमाचे मुख्य आकर्षण म्हणजे ‘मलबार गोल्ड’ (Malabar Gold) यांच्यातर्फे आयोजित करण्यात आलेला ‘होम मिनिस्टर’ आणि ‘फॅन्सी ड्रेस’ स्पर्धा असणार आहे. मनोरंजन आणि कलागुणांना वाव देण्यासोबतच महिलांना उपयुक्त माहिती मिळावी, यासाठी विशेष व्याख्यानांचेही आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये मलटण नागरी आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रियांका गाडेकर आणि डॉ. शितल सोनवलकर या महिलांना ‘आरोग्यविषयक’ अत्यंत महत्त्वाची माहिती देणार आहेत. तर, नगरपरिषदेच्या लेखापाल श्रीमती अभिलाषा नेरे या महिलांसाठी असलेल्या ‘विविध शासकीय योजनांची’ सविस्तर माहिती देणार आहेत.
मान्यवरांची प्रमुख उपस्थिती:
हा कार्यक्रम सातारा जिल्हा परिषदेच्या माजी सदस्या सौ. जिजामाला रणजितसिंह नाईक निंबाळकर, सौ. मनीषाताई समशेरसिंह नाईक निंबाळकर, सौ. गौरीताई सचिन पाटील, फलटण नगरपरिषदेच्या उपनगराध्यक्षा सौ. प्रियदर्शनी भोसले, महिला व बालकल्याण समितीच्या सभापती सौ. मोहिनी हेंद्रे आणि उपसभापती सौ. कांचन व्हटकर यांच्या प्रमुख अध्यक्षतेखाली संपन्न होणार आहे.
तसेच याप्रसंगी श्रीमती मंगलादेवी पृथ्वीराज नाईक निंबाळकर (काकीसाहेब), मागासवर्गीय दुर्बल घटक कल्याणकारी समितीच्या सभापती सौ. सुपर्णा अहिवळे, उपसभापती सौ. अस्मिता लोंढे यांच्यासह सौ. रुपाली सस्ते, सौ. मिना काकडे, सौ. स्वाती भोसले, सौ. सुलक्षणा सरगर, कु. सिद्धली शहा, सौ. स्मिता शहा, सौ. कविता मदने, सौ. रुपाली जाधव, कु. श्वेता तारळकर आणि सर्व सन्माननीय नगरसेविका प्रामुख्याने उपस्थित राहणार आहेत.
महिलांना उपस्थित राहण्याचे आवाहन:
या विशेष कार्यक्रमात विविध क्षेत्रांत कर्तृत्व गाजवणाऱ्या महिलांचा सत्कार आणि बक्षीस वितरण समारंभही पार पडणार आहे. तरी शहरातील सर्व महिलांनी या गुणदर्शन व सांस्कृतिक कार्यक्रमास बहुसंख्येने उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी, अशी नम्र विनंती महिला व बालकल्याण समिती आणि नगरपरिषदेच्या वतीने करण्यात आली आहे.

