
स्थैर्य, फलटण, दि. २५ सप्टेंबर : शारदीय नवरात्रोत्सवाचे औचित्य साधून ‘रक्षक रयतेचा न्यूज’ आणि ‘महिला मंच, फलटण’ यांच्या वतीने महिलांसाठी विविध स्पर्धा आणि कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. गगनगिरी ज्वेलर्स, लायन्स क्लब, माळजाई मंदिर उद्यान समिती आणि नंदाज युनिक किचन यांच्या संयुक्त विद्यमाने हे उपक्रम राबवले जात आहेत.
यामध्ये महिलांसाठी ‘नवरंग नवरात्री फोटो स्पर्धा’ आयोजित करण्यात आली असून, स्पर्धकांना नवरात्रीच्या नऊ दिवसांत त्या-त्या रंगाच्या साडीतील वेशभूषेचे फोटो पाठवायचे आहेत. प्रत्येक रंगासाठी दररोज आकर्षक बक्षीस ठेवण्यात आले आहे. तसेच, ‘पाककला स्पर्धे’अंतर्गत ‘उपवासाचे पदार्थ’ बनवण्याची स्पर्धा होणार आहे. स्पर्धकांनी घरून पदार्थ बनवून आणायचे असून, प्रत्येक सहभागी स्पर्धकाला हमखास गिफ्ट मिळणार आहे.
या स्पर्धांचा बक्षीस वितरण समारंभ रविवार, दि. २८ सप्टेंबर रोजी सायंकाळी ५ वाजता माळजाई मंदिर येथे होणार आहे. याच दिवशी महाभोंडला आणि सर्वांसाठी मोफत खुल्या दांडियाचेही आयोजन करण्यात आले आहे. महाभोंडला आणि दांडियामध्ये सहभागी होण्यासाठी पूर्व-नोंदणी करणे आवश्यक आहे.
या उपक्रमांच्या अधिक माहितीसाठी आयोजक सौ. असिफा शिकलगार, सौ. रूपाली कचरे, सौ. नंदा बोराटे, सौ. निता दोशी, सौ. मनीषा घडिया, सौ. प्रियांका सस्ते, सौ. सुवर्णा शिंदे, सौ. अनुराधा रणवरे व सौ. उज्वला गोरे यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.