‘वंदे मातरम्’ नित्यनूतन, प्रेरणादायी – राज्यपाल भगतसिंह कोश्यारी

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य । दि.२६ जानेवारी २०२२ । मुंबई । वाल्मिकी रामायण तसेच तुलसीदासांच्या रामचरित मानसप्रमाणे बंकीम चंद्र यांचे ‘वंदे मातरम्’ हे काव्य व त्याचे सांगीतिक सादरीकरण कधीही जुने न होणारे असे नित्यनूतन व प्रेरणादायी असल्याचे प्रतिपादन राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी केले.

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षाचे औचित्य साधून दिवंगत गायक-संगीतकार विनायक देवराव अंभईकर यांनी संगीतबद्ध केलेल्या ‘संपूर्ण वंदे मातरम्’वर आधारित नव्या सांगीतिक रचनेचे प्रकाशन राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांच्या हस्ते राजभवन, मुंबई येथे करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते.

यावेळी संपूर्ण वंदे मातरम् रचनेचे गायक मंदार आपटे, गायिका स्वाती आपटे व अर्चना गोरे, निर्माते नचिकेत अंभईकर, दिवंगत विनायक अंभईकर यांचे कुटुंबीय, उद्योजक रवींद्र प्रभुदेसाई, एजियाज फेडरलचे उपाध्यक्ष राजेश आजगावकर, वन्दे मातरम् च्या नृत्य दिग्दर्शिका पूजा पंत, पखवाज वादक चंद्रशेखर आपटे, व्यंगचित्रकार श्रीनिवास प्रभुदेसाई, आदी प्रामुख्याने उपस्थित होते.

‘आनंदमठ’ कादंबरी लिहिली गेली त्यावेळी बंकीम चंद्र यांनी त्यातील वंदे मातरम् ही रचना अजरामर होईल अशी कल्पना देखील केली नसेल असे सांगून देशाच्या स्वातंत्र्य लढ्यात ‘वंदे मातरम्’ हे प्रेरणा गीत ठरले तसेच अनेक क्रांतिकारक ‘वंदे मातरम्’ चा उद्घोष करीत वधस्तंभावर गेले असे राज्यपालांनी सांगितले.

वंदे मातरम् या गीताला शेकडो संगीतकारांनी संगीतबद्ध केल्याचे नमूद करून विष्णू सहस्त्रनामाप्रमाणे या रचना नेहमीच प्रेरणादायी असल्याचे राज्यपालांनी सांगितले.

यावेळी मंदार आपटे व अर्चना गोरे यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे ‘ने मजसी ने’ हे गीत सादर केले.


Back to top button
Don`t copy text!