
स्थैर्य, फलटण, दि. १७ नोव्हेंबर : फलटण नगरपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर खासदार गटाला मोठे बळ मिळाले आहे. वंचित बहुजन आघाडीच्या सौ. सपनाताई भोसले यांनी आज माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या प्रमुख उपस्थितीत भारतीय जनता पार्टीमध्ये (भाजप) जाहीर प्रवेश केला.
या पक्षप्रवेशावेळी सपनाताई भोसले यांनी महिलांच्या मुद्द्यांवर आग्रही भूमिका मांडली. त्यांनी प्रामुख्याने महिला सक्षमीकरण, महिलांसाठी रोजगार निर्मिती तसेच संपूर्ण तालुका आणि फलटण शहरातील मुली व महिलांच्या सुरक्षेबाबत ठोस उपाययोजना करण्याची मागणी केली.
माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी सपनाताई भोसले यांनी मांडलेल्या सर्व मुद्द्यांना सकारात्मक प्रतिसाद दिला. आगामी काळात महिला सक्षमीकरण आणि सुरक्षेच्या या सर्व बाबींवर महायुती कटिबद्ध राहून काम करेल, अशी स्पष्ट हमी रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी यावेळी दिली. त्यांनी सपनाताई भोसले आणि त्यांच्यासोबत आलेल्या सर्व महिला कार्यकर्त्यांना शुभेच्छा दिल्या.
या पक्षप्रवेश सोहळ्याप्रसंगी खासदार गटाचे प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते. यामध्ये माजी नगरसेवक सचिन अहिवळे, सुधीर अहिवळे, सौ. अनिता प्रशांत काकडे, सनी भाऊ मोरे, विकी बोके, महेश जगताप, सुनील अहिवळे यांच्यासह शेकडो कार्यकर्ते आणि महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

