
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पूर्ण ताकदीने लढवण्याचा वंचित बहुजन आघाडीचा निर्धार. कोळकी येथील बैठकीत संघटनात्मक बांधणीवर भर.
स्थैर्य, फलटण, दि. २३ डिसेंबर : आगामी महानगरपालिका आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर वंचित बहुजन आघाडीची (सातारा पूर्व) महत्त्वपूर्ण बैठक कोळकी येथे पार पडली. जिल्हाध्यक्ष रामदास कांबळे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीत गावोगावी पक्षसंघटना मजबूत करून आगामी निवडणुका पूर्ण ताकदीने लढवण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला.
कोळकी (ता. फलटण) येथील बुद्ध, फुले, शाहू, आंबेडकर सामाजिक सभागृहात ही बैठक आयोजित करण्यात आली होती. बैठकीत नुकत्याच पार पडलेल्या नगरपरिषद निवडणुकीतील कामगिरीचा आढावा घेण्यात आला. तसेच, आगामी काळात गावोगावी वंचित बहुजन आघाडीच्या शाखा उभारून जनसंपर्क वाढवण्यावर भर देण्याचा निर्णय घेण्यात आला.
बैठकीच्या सुरुवातीला एक वेगळा आदर्श पाहायला मिळाला. भारतीय बौद्ध महासभा, फलटण शाखेच्या वतीने तालुकाध्यक्ष महावीर भालेराव आणि सचिव चंद्रकांत मोहिते यांनी जिल्हाध्यक्ष रामदास कांबळे यांचा डॉ. बाबासाहेब आंबेडकर लिखित ‘बुद्ध आणि त्यांचा धम्म’ हा ग्रंथ देऊन गौरव केला. तसेच, उपस्थित सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांना भारतीय संविधानाच्या उद्देशिकेची प्रत भेट देऊन सन्मानित करण्यात आले. हा उपक्रम सामाजिक न्याय आणि संविधानिक मूल्यांप्रती असलेल्या निष्ठेचे प्रतीक ठरला.
यावेळी बोलताना पदाधिकाऱ्यांनी ॲड. प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली राजकीय सत्ता हस्तगत करण्याचे उद्दिष्ट बोलून दाखवले.
“वाड्या-वस्त्या आणि गावागावांत पोहचून संविधानाचे संरक्षण आणि सर्वसमावेशक विकासाचे स्वप्न साकार करण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत,” असा सूर बैठकीत उमटला.
या बैठकीस जिल्हाध्यक्ष रामदास कांबळे, जिल्हा उपाध्यक्ष सुभाष गायकवाड, सचिव अरविंद आढाव, अशोक भोसले, उपाध्यक्ष विजय लोंढे, सचिव ॲड. तेजस मोरे, फलटण तालुकाध्यक्ष संदीप काकडे, शहराध्यक्ष उमेश कांबळे, माण तालुकाध्यक्ष युवराज भोसले, महिला जिल्हा उपाध्यक्ष चित्राताई गायकवाड, अजित कांबळे, सुमित मोरे यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. ‘जय भीम, जय संविधान’च्या घोषणेने बैठकीची सांगता झाली.

