स्थैर्य, फलटण, दि. ०३: फलटण तालुक्यातील दुधेबावी व गिरवी परिसरातील भवानी डोंगराला गेले दोन दिवस वणवा लागलेला आहे. भवानी डोंगरावर लागलेल्या वणव्याच्या आगीत गवत व वनविभागाने लावलेली झाडे जाळून खाक झाली. वन विभागाने या परिसरात शेकडो झाडे लावलेली आहेत. आगीत मोठ्या झाडांचे नुकसान झालेले नाही, मात्र छोटी झाडे आगीत भस्मसात झाली आहेत. शेतकऱ्यांना जनावरांसाठी उपयुक्त असणारे डोंगरी गवत मोठ्या प्रमाणात जाळून खाक झाले आहे. शक्य होते त्याठिकाणी आग आटोक्यात आणल्यामुळे बाजूचे क्षेत्र वाचलेले दिसत आहे. दुधेबावी व गिरवी गावसह पंचक्रोशीतील अनेक मेंढपाळ ह्या भवानी डोंगरावर आपली जनावरे चरायला कायम नेहतात.