
१४ फेब्रुवारी हा संत व्हॅलेंटाईन यांचा स्मृतिदिन ‘प्रेम दिवस’ म्हणून जगभर साजरा केला जातो. इसवी सन तिसऱ्या शतका दरम्यान होऊन गेलेला हा एक रोमन संत होता. त्या वेळच्या रोमन सम्राटाने तरुणांसाठी सैन्य भरती अनिवार्य करून त्यांच्या विवाहावर बंदी आणली. हा एक त्यांच्यावर केलेला असह्य असा अन्याय होता. सळसळत्या तारुण्यावर तो घाला होता.
व्हॅलेंटाईनला ते रुचले नाही, म्हणून त्याने युवकांचे विवाह लावून देणे सुरू केले. त्यामुळे सम्राटाने त्याला तुरुंगात टाकून देहांताची शिक्षा ठोठावली. तुरुंगवासातच जेलरच्या मुलीशी त्याची ओळख झाली आणि ओळखीचे पर्यवसान प्रेमात झाले.साक्षात मृत्यू समोर असताना तिला त्याने प्रेम पत्र लिहिले .हा प्रेमाचा सन्मान होता.
व्हॅलेंटाईनचे संतत्व प्रेमातून साकार झाले. जगातील अनेक संत आणि धर्म संस्थापक प्रेमाचाच संदेश देऊन गेले. श्रीकृष्णापासून ख्रिस्तापर्यंत सर्वांनीच जगाला प्रेमाचा संदेश दिला, व्हॅलेंटाईननेही आपले जीवन प्रेमव्रतातून साकार केले, म्हणून त्याच्या नावे हा उत्सव साजरा केला जातो.
अर्थात रोममध्ये व्हॅलेंटाईन आधीही अशी परंपरा होती. फेब्रुवारी महिन्यात पक्षांचा प्रजनन काळ असतो, हे लक्षात घेऊन प्राचीन काळापासून ‘पॅगन’ नावाचा हा उत्सव चालू होता. व्हॅलेंटाईनच्या काळात मानवी प्रणयाराधनेचाही सन्मान व्हावा असे वाटल्याने त्या वेळच्या ख्रिश्चन व्यवस्थेने व्हॅलेंटाईनचा स्मृतिदिन एक प्रेमदिवस म्हणून साजरा व्हावा अशी मान्यतेची मोहोर टाकली. काहीही असो प्रेम भावनेचा तो गौरव होता. ही मानवी नैसर्गिक भावना धर्मव्यवस्थेच्या खिजगणतीतही नव्हती. तिला आता समाज मान्यता लाभली. अर्थात हे प्रेम स्त्री-पुरुषांमधील एका उत्कट नात्याशी संबंधित होते.
याच प्रेमाला व्हॅलेंटाईनने सन्मानित केले. म्हणून त्याचा स्मृतिदिन ‘प्रेमदिवस’ म्हणून आधी युरोपमध्ये व नंतर जगभर साजरा होऊ लागला. मानवी जाणिवेचे हे प्रगल्भ असे रूप आहे ,पण याच प्रेमाला सत्य म्हणून माणसाने कवटाळून बसू नये.या प्रेमाच्या पायावर वैश्विक प्रेमाकडेही आपल्याला जाता येईल, याचे भान ठेवले पाहिजे. असे प्रेम भारतीय संतांनी शिकवले.
प्रेम ही भावना नेमकी कशी व कधी निर्माण होते, याविषयी नेमके सांगता येत नाही.हा ज्याच्या त्याच्या अनुभूतिचा भाग असतो, पण सहवासातून जवळीकता आणि जवळीकतेतून एकमेकांविषयी ओढ वाटणे यातून ही भावना निर्माण होते. असे काहीसे म्हणता येईल. अर्थात या मार्गाने उदयाला आलेले प्रेम हे खरेखुरे असते. आणखी एका मार्गाने ते सरधोपटपणे येत असते. कोठेतरी रस्त्यावर, कॉलेजमध्ये, चौकामध्ये,एखाद्या सभासमारंभात अगदी मंदिरातही नजरेला नजर भिडल्याबरोबर मनामध्ये कसली तरी उलथापालत होते आणि तेच प्रेम म्हणून उदयाला येते.
पण जरा चाचपणी केली तर, हे प्रेम आकर्षणातून मूळ धरू पाहत असते. अलिकडे याच प्रेमाचा गवगवा झालेला दिसतो. कारण युवकांना थांबणे माहीत नसते, अस्थिर व सैरभर मनात उद्भवणाऱ्या या भावनेच्या आहारी जातात आणि त्यालाच ते प्रेम समजतात. असे प्रेम आंधळे असते याची प्रचिती येते .म्हणूनच मग पुढच्या वाटचालीत ठेच लागते. हृदयबंबाळ अवस्था वाट्याला येते आणि जीवन नकोसे वाटते. अशा प्रेमाचा धिक्कार केला पाहिजे. व्हॅलेंटाईनला असे प्रेम अभिप्रेत नसावे. ज्या प्रेमाची परिणती आयुष्याच्या शेवटपर्यंत सुखनैव पोहोचण्यात असते, तेच खरे प्रेम असते.
प्रेमाचा तिसरा एक स्तर आहे ही एक भावना आहे, तसेच ते एक मूल्यही आहे. कोणतेही मूल्य भावनेच्या अधिष्ठानावर उभे असते. सबंध मानव जातीला एकाच धाग्यात गुंफण्याची क्षमता या मूल्यामध्ये असते.संतांचा प्रेमभाव हा प्रेम मूल्याचा खरा अविष्कार असतो. प्रेम जसे व्यक्तीवर असते तसे ते वैश्विकह असते. व्यक्तीवरील प्रेम वैश्विक असतेच असे नाही, उलट वैश्विक प्रेम व्यक्तीवरही असू शकते. व्यक्तिगत प्रेम द्वेषयुक्त असेल तर वैश्विक प्रेम निव्वळ प्रेम असते. महापुरुषांच्या प्रेमाला करुनेचे अधिष्ठान असते. भगवान श्रीकृष्ण, भगवान बुद्ध, भगवान महावीर, येशू ख्रिस्त, मंहम्मद पैगंबर अशा धर्म संस्थापकांच्या जीवनाचा आधार करूणाच होती. या करुणेतून त्यांच्या प्रेमाचा आविष्कार झालेला होता, म्हणूनच हे प्रेम प्राणिमात्रांना आपल्या कवेत घेऊ शकते. असे प्रेमच षड्विकारांवर मात करीत असते. संतांचेही प्रेम याच प्रकारचे असते.
प्रेम आणि संत ह्या एकाच नाण्याच्या दोन बाजू होत. म्हणूनच तुलसीदासांचे प्रेम पत्नीकडून प्रभु श्रीरामचंद्रांकडे असा प्रवास करून वैश्विक बनते. या प्रेमानेच तुलसीदासांना संतत्व बहाल केले. वाल्याचा वाल्मिकी ही विश्वात्मक प्रेमाची पावती होती. तर संत मीराबाई प्रेमाची भोक्ती आणि श्रीकृष्णाची चाहती होती. प्रेम ही संज्ञा स्पष्ट करता येईल, पण प्रेम ही भावना मात्र अनिर्वचनीय राहील. ती शब्दातून स्पष्ट करता येत नाही, पण कृतीतून व्यक्त होते.
प्रेमाचे आणखी एक वर्गीकरण करता येईल, एक शारीरिक तर दुसरे प्लेटॉनिक प्रेम असते. जे प्रेम आकर्षणातून निर्माण होत असते, ते शारीरिक असते. ते काही काळापुरतेच टिकते .आज प्रेम विवाहसुद्धा घटस्फोटात परिणत होत आहेत .याचे कारण तेच आहे. याउलट प्लेटोनिक लव्ह हे काहीसे मानसिक असते. दोन मनांचा तेथे सुसंवाद असतो. ‘या हृदयीचे त्या हृदयी ‘असा हा संवाद असतो. या ठिकाणी गुणदोषांसहित स्वीकार केलेला असतो. त्यामुळे या प्रेमाचे पर्यवसान निष्ठेत होते, निष्ठेच्या आधारावर विवाह कायम टिकू शकतो, असे प्रेम हे प्रेम राहत नाही, तर ते मूल्यही बनते. बिकटप्रसंगी देखील हे टिकून राहते . व्यावहारिक पातळीवर या व्यक्तीं काही कारणास्तव कधीच एकत्र आलेल्या नसतात किंवा परस्परांपासून अलग राहिल्या तरी, त्या परस्पर चिंतनात आणि परस्परांच्या सुखात आपला पुढील काळ व्यतीत करीत असतात.
हा आदर्शवाद आजच्या लौकिक जीवनातून हद्दपार झालेला असला किंवा सिनेमातूनही तो पडद्यामागे गेलेला असला तरी या प्रेमाची जिती जागती उदाहरणे या विश्वाच्या पसाऱ्यात आपल्या मनातील सल मनातच ठेवून जगताना दिसतील. अशा जीवनाला शोकांतिका म्हणावे की प्रेमाचा विजय म्हणावे ! हजारो वर्षांच्या वाटचालीत समाज ,कुटुंब, विवाह या प्राचीन मानवाच्या प्रयत्नांतून आणि प्रतिभेतून उदयाला आलेल्या संस्था आहेत. मानवी जीवनाला स्थिरता नि गती व तिच्यातून प्रगती असे आयाम या संस्थांकडून लाभले आहेत. याचे भान एकविसाव्या शतकात वाटचाल करीत असताना माणसाला राहिले तर त्याचे प्रेम आणि त्याला पायाभूत ठरणारा त्याग यांना महत्त्व येईल. कुटुंब, लग्न ही दोन जीवांची घुसमट नसून एकमेकांच्या मनाचा वेध घेणारी, एकमेकांना घडवणारी प्रयोगशाळा आहे.या प्रयोगशाळेतूनच प्रेमाचे रसायन तयार होते. अशा आजीवन प्रेम शाळेचा उदघोष व्हॅलेंटाईनच्या स्मृतीसोहळ्यातून व्हावा.