माहुलीतील महाराणी ताराबाई यांच्या समाधीला वज्रलेप

पुण्याच्या गौरव घोडे यांच्या श्री स्वामी ओम मल्हारी प्रतिष्ठानच्यावतीने प्रक्रिया

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य । 29 मार्च 2025। सातारा। मंदिर वज्रलेपासाठी प्रसिद्ध असलेल्या गौरव घोडे यांच्या श्री स्वामी ओम मल्हारी प्रतिष्ठानच्यावतीने माहुली येथील महाराणी ताराबाई यांच्या समाधीची वज्रलेप प्रक्रिया पूर्ण करण्यात आली. या प्रक्रियेमुळे या समाधीच्या चिरांचे आयुष्य 50 वर्षांनी वाढले आहे. या उपक्रमासाठी घोडे यांनी वैयक्तिक दोन लाखांची पदरमोड केली आहे. या प्रतिष्ठानच्यावतीने ताराबाईच्या समाधीची महाआरती आणि विशेष पूजा करण्यात आली.

सातारकरांनी पुढाकार घेऊन महाराणी ताराबाई यांच्या समाधी स्थळ जपण्यासाठी प्रयत्न करावेत, असे आवाहन घोडे यांनी केले. महाराणी ताराबाई यांचे किल्ल्यावर 1761 सातार्‍यातील अजिंक्यतारा मध्ये निधन झाले. संगम माहुली येथे त्यांची समाधी बांधण्यात आली होती.

मात्र, माहुली येथे एका ठिकाणी त्या समाधीच्या दगडी रचना उघड्या स्वरूपात ठेवण्यात आल्या होत्या. या समाधीच्या संवर्धनाचे व जीर्णोद्धाराच्या आश्वासनांचे फुगे गेल्या पंधरा वर्षात अनेकदा हवेत उडाले. प्रत्यक्षात काहीच झाले नाही. मात्र, कृष्णा नदीपात्रात वाळूत गाडली गेलेली समाधी काही संघटनांच्या पाठपुराव्यामुळे पुन्हा चर्चेत आली. राज्याचे बांधकाम मंत्री ना. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी सुद्धा या समाधीचा जीर्णोद्धार करण्यासंदर्भात सुतोवाच केले.

प्रसार माध्यमांनी या समाधीच्या दुरावस्थेविषयी आवाज उठवला होता. ही माहिती गौरव घोडे यांच्या कानावर गेल्यावर त्यांनी तातडीने प्रतिष्ठानच्या माध्यमातून माहुली येथे येऊन या समाधीच्या दगडी चिरांना वज्रलेप केला आणि या समाधीच्या चिरांचे आयुष्य आणखी 50 वर्षांनी वाढवले. मूळचे बारामतीचे पण पुण्यात स्थायिक झालेले गौरव घोडे प्राचीन मंदिरे, पुरातन समाधी यांच्या जीर्णोद्धाराचे आणि संवर्धनाचे काम गेल्या वीस वर्षांपासून करतात. त्यांनी आतापर्यंत कर्नाटकातील महिलापूरमध्ये कार्य केले आहे.

सामान्य कुटुंबात घोडे यांचा जन्म झाला. त्यांचे वडील, आजी, कुटुंबीय जेजुरी वेधील मल्हारी मार्तंड खंडोबाची नित्य सेवा करतात. स्वामींनी खंडोबा रूपात दर्शन व भंडारा दिल्याने अंथरुणाला खिळलेली त्यांची आई ठणठणीत बरी झाली. वडिलांनी श्री स्वामी ओम मल्हारी या मंत्राचा जप करण्यास सुरुवात केली. यापासून प्रेरणा घेऊन गौरव घोडे यांनी मंदिर संवर्धनाचे आणि संगोपनाचे काम सुरू ठेवले.

आणि प्रतिष्ठानचे त्याच नावाने नामकरण केले. मंदिराचा वज्रलेप घोडे विनामूल्य करतात. महाराणी ताराराणी यांच्या समाधीला वज्रलेप करण्यासाठी त्यांनी वैयक्तिक दोन लाख रुपये खर्च केला आहे. प्रतिष्ठानच्यावतीने या समाधीचा वज्रलेप झाल्यानंतर समाधीची विशेष पूजा बांधण्यात येऊन आरती करण्यात आली.

छत्रपती शिवरायांचे वडील शहाजीराजे यांची कर्नाटक राज्यातील होदेगिरी येथील समाधीला विनामूल्य वज्रलेप करणार असल्याचे घोडे यांनी सांगितले.


Back to top button
Don`t copy text!