
स्थैर्य, फलटण, दि. 10 नोव्हेंबर : फलटण नगरपरिषदेच्या आगामी निवडणुकीत प्रभाग क्रमांक २ मधून महिला उमेदवारांमध्ये भाजपच्या माजी नगरसेविका सौ. वैशाली सुधीर अहिवळे यांचे नाव आघाडीवर आहे. घरात दोन पिढ्यांचा राजकीय वारसा आणि स्वतःचे प्रभावी सामाजिक कार्य यामुळे त्यांनी स्थानिक राजकारणात आपला वेगळा दबदबा निर्माण केला आहे.
वैशाली अहिवळे यांना भक्कम राजकीय पार्श्वभूमी लाभली आहे. त्यांचे सासरे दिवंगत तानाजीराव अहिवळे यांनी फलटण नगरपरिषदेचे उपनगराध्यक्षपद भूषवले होते, तर त्यांच्या थोरल्या जाऊबाई श्रीमती स्वाती आशिष अहिवळे यांनीही उपनगराध्यक्ष म्हणून काम पाहिले आहे. घरातूनच मिळालेली राजकारणाची शिदोरी आणि जनतेचा विश्वास ही त्यांची जमेची बाजू आहे.
भाजपचे माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी कार्यक्षम आणि जनसंपर्क असलेल्या उमेदवारांना संधी देण्याचे धोरण अवलंबले आहे. त्यामुळे प्रभाग २ मधून वैशाली अहिवळे यांना भाजपची उमेदवारी मिळण्याची शक्यता बळावली आहे. त्यांच्या प्रभावी कार्यपद्धतीमुळे त्या प्रबळ दावेदार मानल्या जात आहेत.
त्यांचे पती सुधीर अहिवळे हे देखील सामाजिक कार्यात नेहमीच अग्रेसर असतात. शहरातील विविध सामाजिक उपक्रम, गरजूंना मदत आणि महिलांच्या प्रश्नांवर त्यांनी सातत्याने काम केले आहे. त्यांच्या या कार्याचा फायदा वैशाली अहिवळे यांना जनसंपर्क वाढवण्यासाठी होत आहे. स्थानिक महिला मतदारांमध्ये त्यांची विशेष लोकप्रियता आहे.
वैशाली अहिवळे यांनी रस्ते, पाणी, आरोग्य आणि महिलांच्या प्रश्नांवर नेहमीच पुढाकार घेतला आहे. त्यांचे थोरले दीर दिवंगत आशिष अहिवळे यांचे युवक संघटनेतील कार्य आजही अनेकांसाठी प्रेरणादायी आहे. त्यांच्या कार्यामुळे जोडलेला मोठा युवा वर्ग आजही अहिवळे कुटुंबाच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे.
प्रभाग २ मधील निवडणूक चुरशीची होणार यात शंका नाही. मात्र, वैशाली अहिवळे यांच्यासारख्या अनुभवी आणि सामाजिक भान असलेल्या महिला उमेदवाराकडे सध्या सर्वांचे लक्ष लागले आहे. भाजप त्यांना संधी देणार का, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

