
माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर आणि नगराध्यक्ष समशेरसिंह नाईक निंबाळकर यांच्या संकल्पनेतून फलटण येथील ‘वैकुंठ स्मशानभूमी’चा कायापालट होणार आहे. दिलीपसिंह भोसले यांच्या ‘महाराजा मल्टीस्टेट’ने या स्मशानभूमीच्या देखभालीची जबाबदारी स्वीकारली असून, नगरपरिषदेत या ठरावाला सर्वानुमते मंजुरी देण्यात आली आहे.
स्थैर्य, फलटण, दि. 26 मार्च : फलटण शहरातील नागरिकांना मूलभूत आणि दर्जेदार सुविधा मिळाव्यात, विशेषतः अंतिम प्रवासासाठी असलेली शहरातील ‘वैकुंठ स्मशानभूमी’ अत्यंत स्वच्छ, सुंदर आणि सुसज्ज असावी, असे स्वप्न माढा लोकसभेचे माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर आणि लोकनियुक्त नगराध्यक्ष समशेरसिंह नाईक निंबाळकर यांनी पाहिले होते. त्यांच्या या संकल्पनेला आता अत्यंत सकारात्मक प्रतिसाद मिळाला असून, श्री सद्गुरु व महाराजा उद्योग समूहाचे प्रमुख तथा माजी नगराध्यक्ष दिलीपसिंह भोसले यांनी याकामी मोठा पुढाकार घेतला आहे.
दिलीपसिंह भोसले यांच्या नेतृत्वात कार्यरत असलेल्या ‘महाराजा मल्टीस्टेट को-ऑपरेटिव्ह सोसायटी’ने या वैकुंठ स्मशानभूमीच्या देखभालीची आणि सुशोभीकरणाची संपूर्ण जबाबदारी स्वीकारण्याची तयारी दर्शवली होती. यासंदर्भातील प्रस्ताव नुकत्याच झालेल्या फलटण नगरपरिषदेच्या सर्वसाधारण सभेत चर्चेसाठी ठेवण्यात आला असता, त्याला सर्वपक्षीय नगरसेवकांनी सर्वानुमते मंजुरी दिली आहे.
“स्मशानभूमीचे चित्र आता नक्की बदलेल” – नगराध्यक्ष
या महत्त्वपूर्ण निर्णयावर बोलताना नगराध्यक्ष समशेरसिंह नाईक निंबाळकर यांनी समाधान व्यक्त केले. ते म्हणाले, “सध्याच्या दुरवस्थेमुळे अनेकदा स्मशानभूमीत जाऊ सुद्धा वाटत नाही, अशी तेथील परिस्थिती आहे. परंतु, दिलीपसिंह भोसले यांनी घेतलेल्या या पुढाकारामुळे स्मशानभूमीचे हे विदारक चित्र आता नक्की बदलेल आणि परिसर स्वच्छ व प्रसन्न होईल, असा मला पूर्ण विश्वास आहे.”
काय होणार बदल? :
या निर्णयानुसार, महाराजा मल्टीस्टेटच्या माध्यमातून स्मशानभूमीत खालीलप्रमाणे महत्त्वपूर्ण बदल आणि सेवा पुरवल्या जाणार आहेत:
-
नियमित स्वच्छता: स्मशानभूमीची नियमित स्वच्छता करणे, झाडलोट करणे आणि पाणी मारून संपूर्ण परिसर कायम निर्जंतुक ठेवणे.
-
निसर्गरम्य परिसर: स्मशानभूमीच्या परिसरात शोभिवंत फुलांची झाडे आणि पर्यावरणपूरक वृक्षांची लागवड करून त्यांचे संवर्धन करणे.
-
प्रसन्न वातावरण: येथील वातावरण शोकाकुल असले तरी ते शांत आणि प्रसन्न राहावे, यासाठी स्मशानभूमीपूरक संगीत आणि भजनांची व्यवस्था केली जाणार आहे.
-
नागरिकांसाठी सोयी-सुविधा: अंत्यविधीसाठी येणाऱ्या नागरिकांसाठी शुद्ध पिण्याच्या पाण्याची सोय, योग्य ठिकाणी विद्युतीकरण (लाईटची व्यवस्था) आणि देखभालीसाठी एक पूर्णवेळ सेवक नेमण्यात येणार आहे.
-
सुसज्ज शववाहिका: संस्थेच्या वतीने एक आदर्श आणि सुसज्ज शववाहिकेची व्यवस्था करण्यात येणार असून अंत्यसंस्कार, सावडणे आणि दशक्रिया विधीसाठी आवश्यक ते सर्व नियोजन केले जाणार आहे.
नगरपरिषद आणि महाराजा उद्योग समूहात ५ वर्षांचा करार:
या महत्त्वपूर्ण आणि सामाजिक उपक्रमासाठी फलटण नगरपरिषद आणि महाराजा उद्योग समूह यांच्यात पाच वर्षांचा सामंजस्य करार (MoU) करण्यात येणार आहे. नगरपरिषदेच्या सभेत या विषयावरील चर्चेत राष्ट्रीय काँग्रेसचे नगरसेवक पंकज पवार, भाजपाचे स्वीकृत नगरसेवक सुदामराव मांढरे आणि उपनगराध्यक्षा सौ. प्रियदर्शनी भोसले यांनी सहभाग घेऊन या स्तुत्य उपक्रमाचे मनःपूर्वक स्वागत केले.
खासगी लोकसहभागातून सार्वजनिक सुविधांचे सक्षमीकरण करण्याचा हा एक आदर्श प्रयोग फलटण शहरात राबवला जात असल्याने नागरिकांमधूनही मोठे समाधान व्यक्त होत आहे.

