स्थैर्य, वडूज, दि.१६: तालुक्याचे मुख्यालय असणार्या वडूज शहराचा कारभार हाकणार्या नगरपंचायतीचा कारभार सध्या सहाशे चौ. मी. असणार्या कार्यालयात सुरू असून नगरपंचायत कार्यालयाला प्रशस्थ कार्यालय कधी मिळणार? असा सवाल नागरिकांना पडला होता परंतु वर्षभरापूर्वी विरोधी पक्षनेते शहाजीराजे गोडसे यांनी नगरपंचायतीच्या मासिक सभेत ठराव करून याबाबत प्रसंगी रस्त्यावर उतरून आंदोलन केल्यामुळे येथील जुन्या तहसीलदार कचेरीच्या इमारतीत नगरपंचायतीचे स्थलांतर करण्याच्या हालचालींना वेग आला आहे. त्यामुळे शहाजीराजे गोडसे यांच्या प्रयत्नमुळे लवकरच वडूज नगरपंचायतीला नवीन इमारत मिळणार आहे.
अठरा हजार लोकसंख्या असणार्या वडूज शहरामध्ये 2016 पर्यंत ग्रामपंचायत होती. त्यानंतर ग्रामपंचायतीचे रूपांतर नगरपंचायतीत झाले. दरवर्षी 14 या वित्त आयोगातून साधारण तीन कोटी, रस्ता अनुदानातून 20 लाख, नवीन न. पा. पायाभूत सुविधा अनुदानातून 25 लाख ,जिल्हास्तर नगरोस्थानातून 1 कोटी, अण्णाभाऊ साठे नागरी वस्ती अनुदानातून 1 कोटी, दलितेतर योजना 60 लाख, सर्वसाधारणपणे असा मिळून विविध विकास कामांसाठी 3 ते 5 कोटी रुपयांचा निधी खर्च करणार्या वडूज नगरपंचायतीचा कारभार सध्या अतिशय लहान कार्यालयात सुरू आहे. या प्रश्नावर पुढे येत विरोधी पक्षनेते शहाजीराजे गोडसे यांनी मोठे आंदोलन केले होते.
सध्या नगरपंचायत सुरू असलेल्या कार्यालायची जागा सहाशे चौ. मी. असून त्यामध्ये नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष, मुख्याधिकारी यांची स्वतंत्र दालने असून उर्वरित भागामध्ये कर्मचार्यांची बसण्याची व्यवस्था केली आहे. त्यामुळे कर्मचार्यांना नागरिकांची कामे करताना नाकी नऊ येत आहेत. कामानिमित्त येणार्या नागरिकांना गाडी लावायला पार्किंगची व्यवस्था नसल्याने नगरपंचायतीच्या शेजारील रस्त्यावर वाहतुकीची वारंवार कोंडी होत असते.
याशिवाय तालुक्याचा मानबिंदू असलेल्या वडूज शहरामध्ये सर्वाधिक दवाखाने आहेत. याठिकाणी जिल्ह्यातुन प्रसूतीसाठी महिला येत असतात. त्यामुळे लहान मुलांच्या जन्माची नोंद असो वा वडूज शहरात एखाद्याचा मृत्यू झाल्यास त्याच्या मयताची नोंद असो; ती नगरपंचायतीमध्येच करावी लागते. त्यासाठी नगरपंचायतीमध्ये गेल्यानंतर अपुर्या जागेमुळे कर्मचार्यांकडून परत या अशी टोलवाटोलवीची उत्तरे मिळत असल्याने लांबून आलेल्या नागरिकांनाही याचा फटका सहन करावा लागत आहे.
प्रत्येक महिन्याला होणार्या मासिक सभेला सदस्य तसेच कर्मचार्यांना बसण्याइतपत जागा नसणार्या नगरपंचायतीची मासिक सभा ही भाड्याच्या हॉल मध्ये होत असते. यापूर्वी विरोधी पक्षनेते शहाजीराजे गोडसे यांनी वडूज तहसील कार्यालयातील जि. प. बांधकाम विभागाचे कार्यालय नगरपंचायतीस मिळावे यासाठी जन आंदोलन उभारले होते. मात्र आता नगरपंचायतीच्या कार्यालयाचा प्रश्न लवकरच सुटणार असल्याने वडूजकरांमध्ये समाधानाचे वातावरण आहे.