दैनिक स्थैर्य । दि. २४ सप्टेंबर २०२२ । अहमदनगर । लम्पी चर्मरोगाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लसीकरणाचे प्रमाण वाढवून लसीकरणाला वेग देण्यात यावा. यासाठी सर्व यंत्रणांनी दक्ष राहून कार्य करावे असे निर्देश राज्याचे महसूल व पशुसंवर्धन मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी आज दिले.
राज्यातील जनावरांना झालेल्या लम्पी चर्मरोगाच्या नियंत्रणासाठी पशुसंवर्धन विभागाने केलेल्या कार्यवाहीसंबधी पशुसंवर्धनमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी अहमदनगर येथून राज्यस्तरीय ऑनलाईन बैठकीत आढावा घेतला त्यावेळी ते बोलत होते. बैठकीला खासदार डॉ. सुजय विखे पाटील, माजी मंत्री शिवाजीराव कर्डिले, पशुसंवर्धन विभागाचे प्रधान सचिव जगदीश गुप्ता व आयुक्त सचिंद्र प्रताप सिंह दूरदृष्य प्रणालीद्वारे सहभागी झाले होते तर जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भोसले, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर, निवासी उपजिल्हाधिकारी पल्लवी निर्मळ, पशुसंवर्धन सहायक आयुक्त डॉ.सुनिल तुंबारे उपस्थित होते.
मंत्री श्री.विखे पाटील यांनी, लम्पी चर्मरोग प्रादूर्भाव रोखण्यासाठी राज्यातील पशुधनाच्या लसीकरणाचा आढावा घेतला. शंभर टक्के लसीकरणाचे ध्येय साध्य करण्यासाठी अधिकाऱ्यांनी ‘लम्पी योद्धा’ बनून त्यांनी काम करावे अशी सूचना केली. राज्य सरकारने संवेदनशीलपणे लम्पीचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी सर्व निर्णयांची अंमलबजावणी केली आहे. “माझे पशुधन, माझी जबाबदारी” घोषवाक्याची अंमलबजावणी करुन, पशुधन वाचविण्यासाठी शासनाच्या प्रयत्नांना सर्वांनीच सहकार्य करण्याचे आवाहनही त्यांनी यावेळी केले. राज्य शासनाने मागील काही दिवसात घेतलेल्या निर्णयाची कठोर अंमलबजावणी केल्यामुळे पशूधन वाचविण्यात यश येत असल्याचे श्री.विखे पाटील म्हणाले.
राज्यात तीस जिल्हयात 231 तालुक्यांत लम्पी रोगाचा प्रादुर्भाव असून राज्यात दररोज सध्या नऊ लाखावर लसीकरण होत असून हा वेग बारा लाखांवर नेण्यासाठी संबधित यंत्रणांनी प्रयत्न करावेत अशा सूचना देऊन 30 सप्टेंबर,2022 पर्यत एक कोटी पशुधनांचे लसीकरण होईली अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. राज्यात सध्या 75 लाख लसी उपलब्ध असून लम्पी रोगाचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी खाजगी डॉक्टरांची मदत घेण्यात येत आहे. या रोगासंदर्भात सोशल मिडीयावरील दिशाभूल करणाऱ्या चूकीच्या संदेशांकडे पशुपालकांनी दुर्लक्ष करावे अशी सूचना त्यांनी केली.
अतिवृष्टी व नैसर्गिक आपत्तीमुळे झालेल्या नुकसनानीचे 26 सप्टेंबरपर्यत शंभर टक्के पंचनामे पूर्ण करा
महसूल, कृषी व ग्रामविकास विभागांनी ताळमेळ ठेवून समन्वयाने कामकाज करत अतिवृष्टीने बाधित झालेल्या क्षेत्राचे 26 सप्टेंबर,2022 पर्यंत शंभर टक्के पंचनामे पूर्ण करावेत आणि शेतकऱ्यांना द्यावयाच्या नुकसान भरपाई संदर्भात माहिती सादर करावी असे निर्देश राज्याचे महसूल, पशुसंवर्धन व दूग्धविकास मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी आज दिले.
अतिवृष्टीने जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे झालेले नुकसान आणि पंचनाम्याबाबतची आढावा बैठक महसूलमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली आज जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित करण्यात आली होती. व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे, जिल्हयातील उपविभागीय अधिकारी यांच्याशी संवाद साधून महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी, अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीचा महसूल मंडळनिहाय आढावा घेतला. त्यावेळी ते बोलत होते. बैठकीला खासदार डॉ. सुजय विखे पाटील, माजी मंत्री शिवाजीराव कर्डिले, जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भोसले, जिल्हा परिषद मुख्याधिकारी आशिष येरेकर, नगर उपविभागीय अधिकारी श्रीनिवास अर्जुन, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शिवाजी जगताप उपस्थित होते.
महसूलमंत्री श्री.विखे पाटील म्हणाले, अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीचा आणि पीक पंचनाम्याच्या कामांना प्राधान्य दिले पाहिजे. शेतकऱ्यांना संकटातून दिलासा देण्यासाठी अधिकारी-कर्मचाऱ्यांनी सकारात्मक राहून कामकाज केले पाहिजे. अतिवृष्टीने नुकसान झालेल्या भागातील एकही शेतकरी मदतीपासून वंचित राहणार नाही याची दक्षता प्रशासनाने घ्यावी. नुकसान भरपाई संदर्भात गेल्या तीन वर्षांतील पिक लागवडीचा निकष ग्राह्य धरण्यात येतो तथापि, बदलत्या काळानुसार त्यामधे सुधारणा करण्यासाठी शासनाला तात्काळ प्रस्ताव सादर करण्याचे निर्देशही त्यांनी महसूल यंत्रणेला दिले. फळबागांच्या नुकसानीच्या पंचनाम्याचे काम कृषी विभागाने करावे, अशा सूचनाही त्यांनी यावेळी दिल्या.
खासदार डॉ.सुजय विखे यांनी, अतिवृष्टीमुळे बाधित आणि नुकसानीची पाहणी ऑनलाईन पद्धतीऐवजी ऑफलाईन पध्दतीने करावी, तसेच शेतकऱ्यांना शासनातर्फे द्यावयाच्या नुकसान भरपाईचा गैरवापर होऊ नये अशी सूचना केली.
जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भोसले यांनी, शासकीय यंत्रणा शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन प्रत्यक्ष नुकसानीचा आढावा घेत असून जिल्हयातील सुमारे चार हजार हेक्टर शेतजमीनीचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज असल्याचे सांगितले. यावेळी जिल्हयातील सर्व उपविभागीय अधिकाऱ्यांनी पीक पंचनाम्याच्या प्रगतीविषयी माहिती सादर केली.