पशु, पक्षी आणि जनावरांचे लसीकरण

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य । दि. ०३ ऑगस्ट २०२२ । सातारा । पावसाळ्याचा तोंडावर म्हणजे पावसाळ्यात आद्रतेचे प्रमाण वाढलेले असते व अशा वातावरणात जीवाणू तसेच विषाणूच्या वाढीसाठी पोषक वातावरण असते. त्यामुळे पावसाळ्यात जीवाणूजन्य व विषाणूजन्य आजाराचे प्रमाण वाढते आणि जर जनावरांना पावसाळ्यापूर्वी लसीकरण केलेले नसेल तर जनावरे दगावतात. रोगाची साथ आल्यानंतर परिसरातील इतर गावातील लसीकरण आधी करुन घ्यावे व शेवटी साथ रोग आलेल्या गावातील निरोग जनावरांचे लसीकरण करुन घ्यावे.

जनावरांना कोणत्याही रोगाची बाधा झाल्यानंतर त्यांच्या उत्पादन क्षमतेवर परिणाम होतोच परंतु काही आजारात घटसर्प, फऱ्या, अंत्रविषारी या सारख्या आजारात उपचार करण्यापूर्वीच किंवा उपचार करुनही जनावर दगावतात त्यामुळे जीवघेण्या रोगापासून जनावरांचा बचाव करण्यासाठी व लाळखुरकुत सारख्या रोगात होणाऱ्या उत्पादन क्षमता तसेच प्रजनन क्षमतेवर परिणाम होतो. तो टाळण्यासाठी लसीकरण करुन घेणे गरजेचे आहे. परंतु तेही रोगाची साथ येण्यापूर्वीच करणे गरजेचे आहे. कारण लस टोचल्यानंतर 3 आठवड्यानंतर जनावरांच्या शरीरात रोगप्रतिकार शक्ती तयार होते. यामुळे  आपण प्रतिबंधक लसीकरण करुन घेवून आर्थिक नुकसान टाळू शकतो.

लसीकरण अधिक उपयुक्त होण्यासाठी जनावरांना आठवडाभर आधी जंतनाशक औषधे देणे, जनावरांच्या शरीरावरील गोचीड, गोमाश्या, उवा, लिखा, पिसवा इत्यादी किटकांचे नियंत्रण करणे तसेच चांगली रोगप्रतिकार शक्ती निर्माण होण्यासाठी जनावरांना क्षारमिश्रण व जीवनसत्वांचा पुरवठा करावा तसेच जनावरांना चांगला सकस आहार द्यावा. लसीकरणानंतर थोडे दिवस जनावरांना प्रतिजैवक औषध देणे शक्यतो टाळावे.

लसीकरण करताना चांगल्या कंपनीची योग्य मात्रेत व योग्य पद्धतीने (शीतसाखळीत) शितपेटीत साठवणूक केलेली लस द्यावी. एकाच वेळी दोन वेगवेगळ्या लसी एकत्र मिसळून देवू नयेत. प्रत्येक जनावरांसाठी नवीन व वेगवेगळ्या सिरिंज, निडल्सचा वापर करावा आणि लसीकरण शक्यतो सकाळी किंवा सायंकाळी थंड वातावरणात करावे, दुपारच्या उन्हात लसीकरण करु नये.

लसीकरणानंतर जनावरांचे अतिउष्ण व अतिथंड वातावरणापासून संरक्षण करावे. तसेच दूरवरची वाहतूक टाळावी. लसीकरणानंतर जनावरांमध्ये ताप येणे किंवा मान न हलविणे अशी लक्षणे आढळतात परंतु ती तात्कालिक व सौम्य स्वरुपाची असतात. लसीकरणानंतर मानेवर गाठ येऊ नये म्हणून हलके चोळल्यास गाठ येत नाही. आलेल्या गाठीला कोमट पाण्याने शेकले तर गाठ जिरुन जाते.

लस दिल्यानंतर लशीमुळे जनावरांमध्ये गर्भपात होते असे नसून सर्वच गाभण जनावरांना लस देणे महत्वाचे आहे. विशेषत: शेळ्या, मेढ्यांना गाभण कालावधीत आंत्रविषार व धनुर्वाताची लस दिल्यास ती व्याल्यानंतर त्यांना व पिल्लांना आजार होत नाही व नवाज पिलांना चिकामुळे रोगप्रतिकार शक्ती मिळते. लसीरकणामुळे येणारा ताप व शारिरीक ताण यामुळे थोड्या प्रमाणात दूध उत्पादन कमी होऊ शकते परंतु केवळ 1 ते 2 दिवसच राहते नंतर ते पूर्ववत होते.

लसीची कमी अधिक प्रमाणातील मात्रा लसीची योग्य तापमाणात साठवणूक न झाल्यास किंवा जनावरात कृमीचा प्रादुर्भावअसल्यास काही वेळा लसीकरणाचा फायदा होत नाही किंवा लाळखुरकुत सारख्या रोगात लसीकरणानंतर एखाद्या वेळी रोग होऊ शकतो कारण रोगाच्या विषाणूच्या मुख्य सात जाती शिवाय 60 मुख्य उपजाती आहेत आणि आपण दिलेल्या लसीत आपल्या भागात आढळणाऱ्या तीन ते चार उपजाती समाविष्ठ केलेल्या असतात त्यामुळे लसीत समाविष्ठ असलेल्या उपजाती शिवाय इतर उपजातीचा विषाणूंचा प्रादुर्भाव झाल्यास लाळखुरकुत रोग होतो.

पावसाळ्यामध्ये पशुधनाचे साथीच्या रोगापासून संरक्षण करण्यासाठी मान्सून पूर्व लसीकरण करुन घेणे गरजचे आहे. पावसाळ्यात वाढलेल्या आद्रतेमुळे सुक्ष्म जिवाणूची वाढ झपाट्याने होते परिणामी पावसाळ्यात विविध साथीच्या आजारांची लागण होते व त्याची तीव्रता जास्त असल्यास जनावरे दगावतात व शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होते. पावसाळ्यात जनावरांना व शेळ्या मेढ्यांना  घटसर्प, फऱ्या, आंत्रविषार, पीपीआर या रोगाची बाधा होते. या रोगाविरुद्ध लसीचा पुरवठा पावसाळ्यापूर्वीच पशुसंवर्धन विभागामार्फत करण्यात येतो व पशुवैद्यकीय दवाखान्यातमार्फत ठरावीक वेळापत्रकानुसार लसीकरण व लसीकरणापूर्वी जंतनिर्मूलन करण्यात येते व त्यामुळे साथीच्या रोगांना अटकावा करण्यात चांगला फायदा होतो.

संकलन  – जिल्हा माहिती कार्यालय, सातारा.


Back to top button
Don`t copy text!