स्थैर्य, फलटण, दि. २०: फलटण तालुक्यातील टाकुबाईचीवाडी या गावामधील ४५ वर्षांवरील ९५% नागरिकांनी लसीकरण करून तालुक्यासह जिल्ह्यासमोर एक वेगळा आदर्श निर्माण करून ठेवलेला आहे. सध्या फलटण तालुक्यात कोरोना आजाराचे रूग्ण हे मोठ्या प्रमाणावर सापडत आहेत. शासन नियमानुसार ४५ वर्षांच्या वरील नागरिकांनी लसीकरण करून घेण्यासाठी विशेष मोहीम ही गेल्या महिन्यापासून सुरू करण्यात आलेली होती. याचाच एक भाग म्हणून टाकुबाईचीवाडी येथील नागरिकांनी लसीकरण करून घेतलेले आहे. यामधील विशेष बाब म्हणजे टाकुबाईचीवाडी येथील नागरिकांनी प्राथमिक आरोग्य उपकेंद्रात लसीबाबत वाट न पाहता थेट बीबी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात जाऊन लसीकरण करून घेतलेले आह. कोरोना प्रतिबंधक लसीबाबत सुरवातीच्या काळात विविध शंका होत्या परंतू फलटण तालुक्यातील टाकुबाईचीवाडी सारख्या ग्रामीण भागातील जर नागरिक लसीकरण करून घेत असतील तर अन्य नागरिकांनी सुध्दा तातडीने लसीकरण करून घ्यावे, असे आवाहन जिल्हा परिषद सदस्य धैर्यशील उर्फ दत्ता अनपट यांनी केलेले आहे.
टाकुबाईचीबाडी ग्रामपंचायतीचे सरपंच कुणाल झणझणे व उपसरपंच निलेश झणझणे यांनी स्वतः गावातील नागरिकांना कोरोना प्रतिबंधक लसीचे महत्व पटवुन दिले. सद्य परिस्थितीत कोरोनाला रोखण्यासाठी लस हीच ढाल आपल्या सर्वांच्या कडे आहे. कोरोनाला आपल्या गावापासून दूर ठेवायचे असेल तर, लसीकरण करणे हे अत्यंत महत्त्वाचे आहे, हे सुद्धा गावकऱ्यांना समजावून सांगितले. त्यामुळेच टाकुबाईचीवाडी येथील ४५ वर्षांच्या वरील नागरिकांनी लसीकरण करून घेतले आहे, असेही धैर्यशील उर्फ दत्ता अनपट यांनी स्पष्ट केले.
कोरोनाला अटकाव घालण्यासाठी देशभरात लसीकरण सुरू झाले आहे. लसीकरणामुळे आतापर्यंत जिल्ह्यात कुणालाही गंभीर स्वरूपाचा त्रास झालेला नाही. लसीकरण मोहीमेच्या सर्व टप्प्यांवर योग्य नियोजन आणि पूर्व तयारी ठेऊन मोहीम यशस्वी करण्याबाबत विधानपरिषदेचे सभापती श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर, आमदार दीपक चव्हाण, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती श्रीमंत रघुनाथराजे नाईक निंबाळकर, सातारा जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष व विद्यमान सदस्य श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांनी वेळोवेळी निर्देश दिले. तसेच लसीकरणानंतर कोणत्याही प्रकारचा गंभीर त्रास होत नसून जो सौम्य स्वरूपातील त्रास हा स्वाभाविक आणि उपचारांनी बरा होणारा आहे. ही लस संपुर्ण सुरक्षीत असुन अफवांवर विश्वास न ठेवता कोरोना लसिकरण करुन घ्यावे, असे ही आवाहन या वेळी जिल्हा परिषद सदस्य धैर्यशील उर्फ दत्ता अनपट यांनी केलेले आहे.