
दैनिक स्थैर्य | दि. २९ ऑक्टोबर २०२१ | सातारा | कोरोना महामारीमुळे संपूर्ण जनजीवन विस्कळीत झाले आहे. सद्य परिस्थितीला कोरोना महामारी आटोक्यात येत असली तरी धोका टळलेला नाही. कोरोना महामारीचा संपूर्ण नायनाट करायचा असेल तर पात्र लोकांनी लस घेणे काळाची गरज आहे. कोरोनापासून बचावासाठी लसीकरण हाच एकमेव पर्याय आहे, असे प्रतिपादन विद्यावर्धिनी चॅरिटेबल ट्रस्टच्या अध्यक्षा श्रीमंत छ. सौ. वेदांतिकाराजे भोसले यांनी केले.
शेंद्रे ता. सातारा येथील अभयसिंहराजे भोसले पॉलिटेक्निकमध्ये मिशन युवा स्वास्थ्य अंतर्गत महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी कोविड–१९ लसीकरण मोहिम (१८ वर्षापुढील मुलां मुलीसाठी) राबविण्यात आली. या मोहिमेच्या शुभारंभप्रसंगी सो. वेदांतिकाराजे बोलत होत्या. यावेळी प्राचार्य एस. यु. धुमाळ, उपप्राचार्य आर. डी. नलवडे, छत्रपती शाहु आय.टी.आय चे प्राचार्य विजय मोहिते, छत्रपती शाहु सायन्स ज्युनिअर कॉलेजचे प्राचार्य कुलकर्णी, अभयसिंराजे भोसले पॉलिटेक्निकचे सर्व शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.
लसीकरण मोहिमेत ८५ मुला- मुलींनी लसीकरणाचा लाभ घेतला. लसीकरणासाठी प्राथमिक आरोग्य केंद्र, कुमठे ता. सातारा येथील डॉ. हजारे व त्यांचे वैद्यकीय पथक उपस्थित होते. लसीकरण मोहिमेसाठी कोविडशिल्ड, कोव्हॅक्सिन या दोन्हीही लसी उपलब्ध होत्या. लसीकरण करणे ही काळाची गरज असून त्याचे फायदे या विषयी डॉ. हजारे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.