अंथरुणाला खिळून (बेड रिडन) असलेल्या रुग्णांसाठी आरोग्य विभागामार्फत लसीकरणाची सुविधा

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य । दि. १७ जुलै २०२१ । मुंबई । अंथरुणाला खिळून असणारे (बेड रिडन) रुग्ण, व्यक्तींना कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरणाची विशेष सुविधा आरोग्य विभागामार्फत उपलब्ध करून देण्यात आली आहे. अशा व्यक्तींच्या माहितीची ऑनलाईन नोंदणी केल्यानंतर पथकामार्फत त्यांचे लसीकरण केले जाईल, असे सार्वजनिक आरोग्य विभागामार्फत कळविण्यात आले आहे.

राज्यात ज्या ठिकाणी घरात अंथरूणाला खिळून असलेले रुग्ण, व्यक्ती आहे आणि ज्यांना कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरण करायचे आहे त्यांच्यासाठी आरोग्य विभागातर्फे लसीकरण नोंदणी सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. जी व्यक्ती अंथरुणाला खिळून आहे व पुढील सहा महिने परिस्थिती तशीच राहण्याची शक्यता असेल अशा व्यक्तींचे लसीकरण करण्यासाठी ही विशेष सुविधा आहे.
अशा व्यक्तींची नावे व पत्ता, संपर्क क्रमांक, अंथरुणाला खिळून असण्याचे कारण आणि सदरची व्यक्ती, रुग्ण लसीकरण करून घेण्यास पात्र असल्याचे डॉक्टरांचे वैद्यकीय प्रमाणपत्र इत्यादी माहिती [email protected] या ईमेलवर पाठविण्याचे आवाहन आरोग्य विभागाने केले आहे. जेणेकरून अशा व्यक्तींचे लसीकरण पथका मार्फत करणे सोयीचे होईल.
अंथरूणाला खिळून असलेली व्यक्ती लसीकरणास पात्र असल्याचा त्यांच्यावर उपचार करणाऱ्या वैद्यकीय तज्ज्ञांचा दाखला तसेच या व्यक्तीचे जवळचे नातेवाईक किंवा काळजी घेणाऱ्या व्यक्तींने लसीकरणासाठीचे संमतीपत्र माहिती सोबत जोडणे आवश्यक आहे, असे आरोग्य विभागाने कळविले आहे.


Back to top button
Don`t copy text!