स्थैर्य, सातारा, दि. ०७ : सातारा जिल्ह्यातील 45 वर्षे व त्यावरील वयोगटातील सर्व व्यक्तींचे कोविड-19 लसीकरणाची मोहिम प्राथमिक आरोग्य केंद्र व उपकेंद्रामध्ये सुरु करण्यात आली आहे. जास्तीत जास्त लोकांची नोंदणी व लसीकरण व्हावे यासाठी प्रशासनामार्फत व्यापक नियोजन करण्यात आले. त्यामुळे आजपर्यंत जिल्ह्यात एकूण 2 लाख 56 हजार 434 एवढे लसीकरण पूर्ण झाले आहे. सद्यस्थितीत लसीचा साठा संपलेला असल्यामुळे उद्यापासून लसीचा साठा उपलब्ध होईपर्यंत लसीकरण मोहिम थांबवावी लागत असल्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा यांनी सांगितले आहे.
1 एप्रिल पासून जिल्ह्यामध्ये 45 वर्षावरील सरसकट व्यक्तींना लसीकरण सुरु करण्यात आले असून जिल्ह्यामध्ये प्रशासनाच्यावतीने प्रभावी नियोजन करुन नागरिकांमध्ये जागरुकता निर्माण केल्यामुळे नागरिकांनी लसीकरणासाठी प्रचंड प्रतिसाद दिला आहे. लसीची मागणी शासनस्तरावर नोंदविण्यात आली आहे. लस उपलब्ध होताच पुन्हा वेगाने लसीकरणाची मोहिम प्राथमिक आरोग्य केंद्र व उपकेंद्रामध्ये पुढे सुरु करण्यात येणार असल्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. गौडा यांनी सांगितले.