दैनिक स्थैर्य । दि. २३ ऑगस्ट २०२२ । मुंबई । राज्यात 22 शासकीय वैद्यकीय महाविद्यालये आहेत. या महाविद्यालयातील प्राध्यापकांची अनेक पदे रिक्त आहेत. या रिक्त पदांसाठी ‘एमपीएससी’ मार्फत लवकरच भरती प्रक्रिया राबविण्यात येईल, अशी माहिती वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीश महाजन यांनी विधान परिषदेत दिली.
नवीन शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील रिक्त पदे भरण्याबाबतचा प्रश्न विधान परिषद सदस्य नागोराव गाणार यांनी उपस्थित केला होता. या प्रश्नाला उत्तर देताना श्री. महाजन बोलत होते.
वैद्यकीय शिक्षण मंत्री श्री. महाजन म्हणाले, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील रिक्त पदे सरळ सेवेने महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत भरण्याबाबतचे धोरण स्वीकारण्यात आले आहे. त्यानुसार सद्यस्थितीत भरती प्रक्रियेची कार्यवाही सुरु आहे. सर्व महाविद्यालयातील रिक्त पदे तातडीने भरण्यासाठी राज्य शासन महाराष्ट्र मेडिकल सर्व्हिस कमिशन तयार करण्यासंदर्भात गांभीर्याने विचार करीत असल्याचेही श्री.महाजन यांनी यावेळी सांगितले.