
संत ज्ञानेश्वर माउलींच्या पालखी मार्गावरील विडणी (ता. फलटण) येथील जागृत देवस्थान असलेल्या श्री उत्तरेश्वर मंदिराचा रहस्यमयी इतिहास, हेमाडपंती वास्तुकला आणि महाशिवरात्रीनिमित्त आयोजित भव्य सोहळ्याची खास माहिती.
स्थैर्य, विडणी, दि. १५ फेब्रुवारी : संत ज्ञानेश्वर महाराज पालखी मार्गावर वसलेल्या विडणी (ता. फलटण) गावाला मोठा अध्यात्मिक वारसा लाभला आहे. गावात विविध देवी-देवतांची मंदिरे असून, मंदिरांमधील घंटारव आणि भजनांच्या मंजूळ स्वरांनी सर्वत्र प्रसन्न वातावरण पाहायला मिळते. याच विडणीकरांचे आराध्य दैवत आणि परिसरातील एक अत्यंत ‘जागृत देवस्थान’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ‘श्री उत्तरेश्वर’ मंदिरात आज महाशिवरात्रीनिमित्त भक्तीचा महापूर आला आहे. लोकवर्गणीतून या ऐतिहासिक मंदिराचा अत्यंत भव्य आणि आकर्षक जीर्णोद्धार करण्यात आला असून, आजच्या महाशिवरात्री उत्सवासाठी हे पांडवकालीन मंदिर सज्ज झाले आहे.
अशी आहे आख्यायिका; असा प्रस्थापित झाला ‘उत्तरेश्वर’
श्री उत्तरेश्वर मंदिराचा इतिहास अत्यंत प्राचीन आहे. जुन्या जाणत्या लोकांकडून सांगितल्या जाणाऱ्या आख्यायिकेनुसार, एका साध्वीने उत्तरेकडे तोंड करून कठोर तपश्चर्या केली आणि भगवान शंकरांना प्रसन्न करून घेतले. तेव्हा देवाने प्रसन्न होऊन तिला उपासनेसाठी एक शिवलिंग आणि नंदी दिला. मात्र, ‘ज्या ठिकाणी हे शिवलिंग व नंदी जमिनीवर ठेवले जाईल, तिथेच मी कायमचा स्थानापन्न होईन,’ अशी अट भगवान शंकरांनी घातली होती. ती साध्वी दक्षिणेकडे मार्गक्रमण करत असताना तिने विडणी या ठिकाणी शिवलिंग खाली ठेवले आणि ते तिथेच कायमचे प्रस्थापित झाले. शंकराचा अवतार या भूमीत झाल्याचा दृष्टांत लोकांना मिळाल्यानंतर त्यांनी विधिवत पूजा सुरू केली आणि उत्तरेकडे तपश्चर्या केल्यामुळे या देवस्थानाला ‘उत्तरेश्वर’ असे नाव पडले.
पांडवकालीन बांधकाम आणि अफजल खानाचा विध्वंस
या मंदिराचे बांधकाम ‘पांडवकालीन’ असल्याचे मानले जाते. येथील गाभारा एका अखंड शिळेमध्ये उभारलेला असून, त्यावर आणि गाभाऱ्यात अत्यंत सुबक असे ‘हेमाडपंती’ कोरीव काम करण्यात आले आहे. मंदिरासमोरील भव्य नंदीची मूर्तीही अखंड पाषाणातील आहे. मात्र, या पुरातन वास्तूच्या इतिहासाला एक भयानक किनारही आहे. इतिहासकाळात छत्रपती शिवाजी महाराजांना भेटण्यासाठी विजापूरहून निघालेल्या क्रूर अफजल खानाने वाटेतील तुळजापूर, पंढरपूर, शिखर शिंगणापूर येथील हिंदूंची मंदिरे उध्वस्त करण्याचा प्रयत्न केला होता. याच प्रवासात त्याने विडणीच्या उत्तरेश्वर मंदिरासमोरील नंदी आणि इतर वास्तूंचीही मोडतोड केल्याचे येथील भग्न अवशेषांवरून स्पष्ट होते. यावरून हे मंदिर शिवकाळाच्याही आधीचे, अत्यंत प्राचीन असल्याचे सिद्ध होते.
शिखर शिंगणापूरच्या कावडी आणि महाशिवरात्रीचा उत्साह
उत्तरेश्वर हे अत्यंत जागृत देवस्थान असल्याने परिसरातील भाविकांची त्यावर अलोट श्रद्धा आहे. पूर्वी कुठल्याही शुभकार्यासाठी याच उत्तरेश्वराचा ‘कौल’ घेतला जात असे. विशेष म्हणजे, चैत्र महिन्यात शिखर शिंगणापूरच्या यात्रेला जाणाऱ्या मानाच्या आणि विडणीकरांच्या कावडी याच मंदिरात अभिषेक घालून पुढे मार्गक्रमण करतात. सध्या ग्रामस्थ आणि भाविकांच्या लोकवर्गणीतून मंदिराचा आणि भव्य सभामंडपाचा आकर्षक जीर्णोद्धार करण्यात आला आहे.
यंदा महाशिवरात्रीनिमित्त मंदिरात श्री शिवलीलामृत ग्रंथ पारायण, भजन, कीर्तन, बेलफुल वाहणे, होम-अभिषेक आणि महाप्रसादाचे भव्य आयोजन करण्यात आले आहे. या मंगलमय सोहळ्यात विडणी गावातील सर्व ग्रामस्थ, विविध मंडळे आणि सर्व जाती-धर्माचे लोक मोठ्या उत्साहाने सहभागी झाले आहेत.
