दैनिक स्थैर्य । दि. २१ फेब्रुवारी २०२२ । पुणे । माहिती व जनसंपर्क महासंचालनालयामार्फत शासकीय प्रसिद्धीचे नियोजन करताना अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी आपल्या क्षमतेचा पूर्ण वापर करीत नाविन्यपूर्ण उपक्रम राबवावेत आणि नव्या तंत्रज्ञानाची ओळख करून घ्यावी, अशा सूचना माहिती संचालक गणेश रामदासी यांनी दिल्या.
पुणे येथील विभागीय माहिती कार्यालयात झालेल्या आढावा बैठकीत संचालक श्री. रामदासी बोलत होते. यावेळी पुणे विभागाचे माहिती उपसंचालक डॉ. राजू पाटोदकर, जिल्हा माहिती अधिकारी डॉ. किरण मोघे, सोलापूर जिल्हा माहिती अधिकारी सोनटक्के, सातारा जिल्हा माहिती अधिकारी दत्तात्रय कोकरे, माहिती अधिकारी सचिन गाढवे आदी उपस्थित होते.
संचालक श्री. रामदासी म्हणाले, माहिती व जनसंपर्क महासंचालनालयामार्फत शासकीय प्रसिद्धीचे व्यापक नियोजन करण्यात येते. असे नियोजन करताना नवमाध्यमांचा अभ्यास, प्रशिक्षण आणि प्रभावी वापर गरजेचा आहे. समाज माध्यमांचा वापर कसा वाढविता येईल याबाबतचे काटेकोर नियोजन करावे.
नव्या पिढीतील कर्मचाऱ्यांची तांत्रिक क्षमता आणि जुन्या कर्मचाऱ्यांचा अनुभव याचा समन्वय साधून प्रसिद्धी उपक्रम राबवावे. तसेच त्यांच्या प्रत्येक कर्मचाऱ्याच्या गुणांचा वापर करुन कार्यक्षम व उत्तम कार्यशैली असलेल्या अधिकारी-कर्मचारी यांना अधिक चांगल्या कामगिरीसाठी प्रेरित करावे.
महासंचालनालयामार्फत घेण्यात येणाऱ्या विविध प्रशिक्षण कार्यक्रमातून स्वत: मध्ये कुशलता आणण्याचा प्रयत्न करावा. विभागात कार्यरत कर्मचाऱ्यांना शैक्षणिक अर्हता वाढीसाठी प्राधान्य देण्यासोबतच आस्थापना, लेखा तसेच आवश्यक त्या नवीन प्रणालीबाबत वेळोवेळी होणाऱ्या प्रशिक्षण कार्यक्रमात सहभाग घ्यावा. महासंचालनालयाच्या हिताचे जे जे उपक्रम राबविण्यात येतील त्यासाठी सर्वतोपरी सहकार्य करण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले.
यावेळी पुणे विभागातील तसेच विभागात करण्यात आलेल्या उपक्रमांची माहिती तसेच भविष्यातील प्रसिद्धीच्या अनुषंगाने येणाऱ्या नियोजनाची माहिती उपसंचालक डॉ. पाटोदकर यांनी दिली. बैठकीचे प्रास्ताविक डॉ. मोघे यांनी केले.