गणपतीमध्ये पारंपरिक वाद्यांचा वापर करा : प्रांताधिकारी सचिन ढोले

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य | दि. ८ सप्टेंबर २०२३ | फलटण | फलटण शहराला व तालुक्याला एक आगळी वेगळी अशी परंपरा आहे. त्याला अनुसरून या वर्षी पासून आपण जास्तीत जास्त पारंपरिक वाद्यांचा वापर करून गणपती उत्सव साजरा करण्यात यावा. डीजेच्या बाबतीत शासनाचे विविध निर्देश आहेत; त्यामध्ये राहूनच गणपती उत्सव साजरे करणे गरजेचे आहे. गणपती काळामध्ये पारंपरिक वाद्यांचा वापर करावा; असे आवाहन प्रांताधिकारी सचिन ढोले यांनी केले.

फलटण येथील दरबार हॉल मध्ये गणपती उत्सव २०२३ च्या आढावा बैठकीत प्रांताधिकारी सचिन ढोले बोलत होते. यावेळी पोलीस उपअधीक्षक राहुल धस, पोलीस निरीक्षक सुनील शेळके, सुनील महाडिक, सहाय्यक पोलीस निरीक्षक सुशील भोसले, नगपरिषदेचे आरोग्य निरीक्षक विनोद जाधव यांच्यासह विविध अधिकारी व गणेश मंडळाचे पदाधिकारी उपस्थित होते.

यावेळी बोलताना प्रांताधिकारी सचिन ढोले म्हणाले कि; फलटण शहरासह तालुक्यातील सर्वच गणेश उत्सव मंडळांनी शासनाने दिलेल्या निर्देशात राहूनच गणेश उत्सव साजरा करणे आवश्यक आहे. गणपती काळामध्ये प्रत्येक गणेश उत्सव मंडळाने वीज घेताना तात्पुरत्या स्वरूपात वीज कनेक्शन महावितरणच्या माध्यमातून घ्यावे. अनधिकृत कनेक्शन घेवू नये; जी मंडळे याचे पालन करणार नाहीत; त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात येणार आहे. यासोबतच नगरपरिषदेने व संबंधित ग्रामपंचायतीने गणेश उत्सव मंडळांची नोंद ठेवणे गरजेचे आहे.

गणपती विसर्जन मिरवणुकीमध्ये सर्वच मंडळांनी सामाजिक जबाबदारी स्वीकारून विसर्जन मिरवणूक काढणे गरजेचे आहे. यामध्ये विशेतः हॉस्पिटल, पुरातन वास्तू व मंदिरांच्या समोरून विसर्जन मिरवणूक काढताना विशेष खबरदारी घेणे गरजेचे आहे. विसर्जन ठिकाणी पोलीस प्रशाशन व नगरपरिषदेने जे निर्देश दिले आहेत; त्याचे तंतोतंत पालन करावे; असेही प्रांताधिकारी सचिन ढोले यांनी यावेळी स्पष्ट केले.

गणपती मंडळांनी गणेश उत्सव काळामध्ये शासनाच्या सर्व निर्देशांचे पालन करणे गरजेचे आहे. यासोबतच नागपरिषद किंवा संबंधित ग्रामपंचायतीने वेळोवेळी दिलेल्या मार्गदर्शक तत्वांचे पालन करणे गरजेचे आहे. पोलीस प्रशासनाची गणेश उत्सव काळामध्ये गणपती मंडळांवर विशेष लक्ष असणार आहे. यासोबत सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे सोशल मीडियावर पोलीस प्रशासनाची करडी नजर आहे. गणपती काळामध्ये कोणीही जर आक्षेपार्ह पोस्ट शेअर केल्या तर त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात येईल; असे मत पोलीस उपअधीक्षक राहुल धस यांनी व्यक्त केले.


Back to top button
Don`t copy text!