गुन्ह्याला वाचा फोडण्यासह गुन्हेगाराला हमखास शिक्षेसाठी फास्टट्रॅक डीएनए युनिटचा उपयोग – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य | दि. २२ ऑक्टोबर २०२१ | नागपूर | महाराष्ट्र पोलीस दलाची जागतिक पोलीस दल म्हणून ख्याती आहे. नागपुरात आज उद्घाटन झालेल्या फास्टट्रॅक डीएनए युनिट व वन्यजीव डीएनए विश्लेषण विभागामुळे कायद्याला बळकटी आणण्यासाठी आवश्यक पुरावे उपलब्ध करणे, गुन्ह्याला वाचा फोडणे व गुन्हेगाराला कडक शासन करणे या प्रक्रियेला गती मिळणार आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज येथे केले.

नागपूर येथे राज्याच्या गृह विभागामार्फत रहाटे कॉलनीस्थित प्रादेशिक न्याय सहायक वैज्ञानिक प्रयोगशाळेमध्ये देशातील वन्यजीवांच्या पहिल्या तर मानवी डीएनएच्या राज्यातील नव्या प्रयोगशाळेची उभारणी करण्यात आली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज या वैज्ञानिक प्रयोगशाळेचे उद्घाटन ऑनलाईन पद्धतीने केले. या कार्यक्रमाला राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील, राज्याचे ऊर्जामंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. नितीन राऊत, पशुसंवर्धन दुग्धव्यवसाय विकास व क्रीडा युवक कल्याण मंत्री सुनील केदार, गृह विभागाच्या न्यायिक व तांत्रिक शाखेचे महासंचालक संदीप बिश्नोई, प्रादेशिक न्यायसहायक वैज्ञानिक प्रयोग शाळेच्या संचालक संगीता घुमटकर, उपसंचालक डॉ. विजय ठाकरे नागपूर येथे उपस्थित होते. या कार्यक्रमाला दूरदृश्य प्रणालीद्वारे उपमुख्यमंत्री अजित पवार, पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे, गृहराज्यमंत्री सतेज पाटील, गृहराज्यमंत्री ग्रामीण शंभूराज देसाई, उपस्थित होते.

यावेळी बोलताना मुख्यमंत्र्यांनी नागपूरमध्ये भारतातील वन्यजीवांच्या पहिल्या तर निर्भया योजनेतंर्गत मानवी डीएनएच्या एकत्रित तीन प्रयोगशाळेचे उद्घाटन करताना गृह खात्याच्या कामकाजाला बळकटी देत असल्याचा आनंद आहे, असे स्पष्ट केले. ते पुढे म्हणाले, महिला व बालक यांच्या संदर्भातील गुन्ह्यांचा तपास जलदगतीने करताना अडचण येते. या प्रयोगशाळेमुळे तपासाला गती येणार आहे. वन्यजीवांच्या हत्येप्रकरणी तस्करी रोखताना, अशा तस्करांवर कारवाई करताना आता ही प्रयोगशाळा कामी येणार आहे.

आपले तंत्रज्ञान हे गुन्हेगारांच्या पुढे असले पाहिजे. त्यामुळे जगातील बदल लक्षात घेऊन आज फास्टस्ट्रॅक मुंबई, नागपूर, पुणे येथील प्रादेशिक न्याय सहायक वैज्ञानिक प्रयोगशाळेचे उद्घाटन केले जात आहे. महाराष्ट्राचे पोलीस, मुंबई पोलीस यांचा संपूर्ण देशात दरारा आहे. तपासामध्ये या नव्या प्रयोगशाळेचा निश्चितच लाभ होईल, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

यावेळी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनीही संबोधित केले. राज्यात लवकरच महिलांच्या संरक्षणासाठी शक्ती कायदा येत्या हिवाळी अधिवेशनात संमत होईल, अशी घोषणा राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी केले. यावेळी बोलताना ते म्हणाले, महिला व मुलांवरील अत्याचारामध्ये वाढ झाली आहे. यावर आळा घालण्यासाठी महाविकास आघाडीने शक्ती कायदा तयार केला आहे. हा कायदा लवकरच संमत केला जाणार आहे. या गुन्ह्यातील आरोपींना तात्काळ शिक्षा देण्यासाठी फास्टट्रॅक डीएनए युनिटची मोठी भूमिका राहणार आहे, असेही त्यांनी सांगितले.

निसर्गातील समतोल राखण्यासाठी वन्यजीवांचे रक्षण करणे आवश्यक आहे. वाघासह इतर लहान-मोठ्या प्राण्यांची शिकार केली जाते. यामुळे निसर्गातील समतोलावर विपरित परिणाम होत आहे. हे टाळण्यासाठी व या गुन्ह्यांमध्ये सामील असलेल्या गुन्हेगारांवर वचक बसविण्यासाठी वन्यजीव डीएनए विश्लेषण विभाग मोलाची भूमिका बजावणार असल्याचे श्री. वळसे पाटील यांनी सांगितले.

ऊर्जामंत्री तथा पालकमंत्री डॉ. नितीन राऊत यांनी या प्रयोगशाळेमुळे तपास यंत्रणेच्या नव्या पर्वाला सुरूवात होत असल्याचा आनंद व्यक्त केला. यावेळी बोलताना डॉ. राऊत म्हणाले, या युनिटमुळे पोलिसांना गुन्ह्यांचा तपास करण्यास लागणारा कालावधी कमी होणार आहे. एवढेच नव्हे तर तपासामध्ये अधिक अचूकता येणार आहे. महिलांची सुरक्षितता ही महाविकास आघाडीची प्राथमिकता आहे. महिलांवर अत्याचार करणाऱ्यावर त्वरित कारवाई करून कायद्याचा एका वचक निर्माण करण्यासाठी महाविकास आघाडी सरकार कटिबद्ध आहे.

या युनिटमध्ये वन्यजीव डीएनए विश्लेषण विभागही सुरू होणार आहे. राज्यातील सर्वाधिक जंगल विदर्भात आहे. वन्यजीवांचे संरक्षण करण्याच्या कामात हे युनिट मोठी भूमिका बजावणार आहे.

न्यायसहायक प्रयोगशाळा अधिक अद्यावत – युवक कल्याण मंत्री सुनील केदार

डीएनए विश्लेषण विभाग सुरू झाल्याने नागपुरातील न्यायसहायक वैज्ञानिक प्रयोगशाळा अधिक अद्ययावत झाली आहे, असे मत राज्याचे पशु संवर्धन व दुग्धविकास मंत्री सुनील केदार यांनी व्यक्त केले.

यावेळी बोलताना केदार म्हणाले, जे बघता येत नाही, जे दिसत नाही, ते सर्व येथे पुरावा म्हणून पुढे येते. फास्टट्रॅक डीएनए युनिट व वन्य डीएनए विश्लेषण विभागामुळे पोलीस व वनविभागाच्या तपास यंत्रणेला नक्कीच लाभ होईल, असेही श्री. केदार यांनी यावेळी सांगितले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रभारी संचालक संगिता घुमटकर, संचलन श्वेता शेलगावकर यांनी तर आभार प्रदर्शन डॉ. विजय ठाकरे यांनी केले.


Back to top button
Don`t copy text!