निवडणुकांमध्ये भाजपाकडून वारेमाप पैशांचा वापर : विद्या चव्हाण

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

दैनिक स्थैर्य । दि. २१ सप्टेंबर २०२२ । सातारा । स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसह सर्वच निवडणुकीमध्ये भाजपा वारेमाप पैशांचे वाटप करीत आहे. संभाव्य होऊ पाहणारी मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीत कितीही पैसे वाटण्याची भाजपाने तयारी ठेवली आहे. कोरेगावचे आ. शशिकांत शिंदे यांच्या मतदारसंघात नुकताच झालेल्या खेड ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत एका मताला तीन हजार रुपयांचा भाव काढण्यात आला होता असा धक्कादायक आरोप राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्षा, माजी आ. विद्या चव्हाण यांनी पत्रकार परिषदेत केला.
महिला पदाधिकारी निवडीच्या अनुषंगाने मुलाखतीसाठी सातारा येथे आलेल्या विद्या चव्हाण यांनी पत्रकारांशी चर्चा केली. यावेळी महिला पदाधिकारी कविता म्हेत्रे, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सुनील माने उपस्थित होते.

विद्या चव्हाण पुढे म्हणाल्या, आज देशापुढे महागाई आणि बेरोजगारी असे दोन महत्त्वाचे मुद्दे असून त्या विरोधात आवाज बसवण्यासाठी महिला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्यावतीने संभाव्य सण आणि उत्सव संपल्यानंतर राज्यभर जिल्हास्तरीय विशाल मोर्चा काढण्यात येणार आहे. भाजपकडून सध्या सातत्याने गांधी घराण्याचा अनादर केला जात आहे. शालेय पाठ्यपुस्तकांमध्ये गांधी घराण्यातील नेत्यांबद्दल आक्षेपार्य लेखन केले जात आहे. देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यात योगदान असणाऱ्यांना बदनाम करण्याचा प्रयत्न केला जात आहे. सद्य परिस्थितीत भाजीपाला समर्थपणे उत्तर देण्याची भूमिका महिला राष्ट्रवादी काँग्रेसने घेतली आहे. ढोंगी हिंदुत्व समाजावर बिंबवण्याचे काम करत देशातील महागाई व बेरोजगारी या मुद्द्यावरून नागरिकांचे लक्ष हटवण्याचे काम भाजपकडून सुरू आहे. ओबीसींना दिलेले आरक्षण सुद्धा भाजपला मान्य नव्हते. आपापसात भांडणे लावून सत्तेची मलई चाखण्याची त्यांची वृत्ती आहे. देशात गरीब लोकांची धर्माच्या नावाखाली पिळवणूक करण्याचे उद्योग सुरू आहेत. महाराष्ट्र घडवण्यात यांचे मोलाचे योगदान आहे त्या जिजाऊ, छत्रपती शिवाजी महाराज यांच्याकडे दुर्लक्ष करून संतपरंपरेला नख लावण्याचा प्रयत्न सातत्याने होत आहे.

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसह अन्य निवडणुकात भाजप वारेमाप पैशांचा वापर करीत आहे. आ. शशिकांत शिंदे यांच्या कोरेगाव विधानसभा मतदारसंघात असलेल्या खेड ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत मताला तीन हजार रुपयांचा भाव काढण्यात आला होता, असा धक्कादायक आरोप त्यांनी यावेळी बोलताना केला. कितीही पैसे वाटा मात्र मुंबई महानगरपालिका आपल्याकडेच ठेवा असे नवीन धोरण भाजपने स्वीकारले असून भाजप ईडीचा चुकीच्या पद्धतीने वापर करत असल्याचा आरोप विद्या चव्हाण यांनी यावेळी केला. बारामती मध्ये भाजपाचे सुरू असलेल्या मिशनबाबत बोलताना त्या म्हणाल्या, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, खा. सुप्रिया सुळे आणि अजित पवार यांचे फार मोठे काम त्याठिकाणी आहे.

बारामतीकरांनी पवार कुटुंबीयांनी केलेल्या कामाची चांगलीच माहिती आहे, त्यामुळे मताला एक लाख रुपये दिले तरी बारामती राष्ट्रवादी मुक्त होऊ शकत नाही, असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.


Back to top button
Don`t copy text!