मास्क वापरा, गर्दीही टाळा; अन्यथा कारवाई : मुख्यमंत्री; आंदोलने, सभा, मिरवणुकांना मनाई; स्थानिक प्रशासनाला आदेश

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


स्थैर्य,मुंबई, दि.१७: लग्न समारंभ, सार्वजनिक कार्यक्रम, सभा-संमेलनांमधील उपस्थितीवर मर्यादा ठेवतानाच मास्क वापरणेही बंधनकारक आहे. कोरोना नियमावलीची कडक अंमलबजावणी करा. गर्दीवर नियंत्रण ठेवा. नियमांचे उल्लंघन केल्यास स्थानिक प्रशासनाने दंडात्मक कारवाई करावी, असे आदेश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मंगळवारी दिले आहेत.

राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये कोरोनाने पुन्हा हातपाय पसरण्यास सुरुवात केली आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांनी सर्व विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, महापालिका आयुक्त, जिल्हा पोलिस प्रमुख यांच्याशी दूरदृश्य प्रणालीद्वारे बैठक घेतली. या वेळी उपमुख्यमंत्री अजित पवार, आरोग्यमंत्री राजेश टोपे, मुख्य सचिव संजय कुमार, टास्क फोर्सचे सदस्य आदी उपस्थित होते. कोरोनाविषयक सर्वत्र दाखवल्या जाणाऱ्या बेफिकिरीबाबत त्यांनी चिंता व्यक्त केली. त्यामुळे मास्क वापरा, गर्दी टाळा, अन्यथा पुन्हा एकदा लॉकडाऊनला सामोरे जावे लागेल, असा इशारा मुख्यमंत्र्यांनी दिला आहे.

जनआरोग्य योजनेला मुदतवाढ
राज्यात महात्मा जोतिबा फुले जनआरोग्य योजना सर्वसामान्यांना लागू असून त्याला ३१ मार्चपर्यंत मुदतवाढ देण्यात येईल. कोरोना उपचारासाठी जी क्षेत्रीय रुग्णालये करण्यात आली आहेत, त्यांचे स्ट्रक्चरल ऑडिट करून घ्यावे, असे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले. स्थानिक स्वराज्य संस्थांनी ग्रामीण आणि शहरी भागात सार्वजनिक ठिकाणांचे, शौचालयांचे, बसस्थानके, उद्याने या ठिकाणी निर्जंतुकीकरणाचे काम हाती घेण्याची सूचनाही बैठकीत करण्यात आली.

कंटेनमेंट झोनची तयारी करा
गेल्या काही महिन्यांमध्ये कोरोनाच्या रुग्णसंख्येत घट आल्याने नागरिकांमध्ये बेफिकिरी दिसून येत आहे. लोकांमध्ये जरी शिथिलता आली असली तरी यंत्रणांमध्ये ती येऊ देऊ नका. नियमांची कडक अंमलबजावणी करा. राज्यात सार्वजनिक ठिकाणी कोरोना नियमांचे पालन होताना दिसत नाही. त्यामुळे आंदोलने, सभा, मिरवणुका यांना परवानगी देऊ नये. विवाह समारंभामध्ये उपस्थितांच्या मर्यादेचे पालन केले जाते का, याची यंत्रणेकडून तपासणी झाली पाहिजे. ज्या भागात रुग्णसंख्या वाढतेय तेथे कंटनेमेंट झोन करायची तयारी ठेवावी, असेही ठाकरे यांनी सांगितले.

महत्त्वाच्या सूचना
– कोरोनाचा संसर्ग असलेल्या भागात किंवा परिसरात टार्गेटेड पद्धतीने तपासण्या करा, एकेका रुग्णाचे किमान २० तरी संपर्क शोधून काढण्याचे निर्देश.
– व्यावसायिक संस्था, संघटनांनी एसओपीची काटेकोर अंमलबजावणी करावी.
– बँक्वेट हॉलमध्ये कोणी विनामास्क आढळल्यास हॉल मालकावर कारवाई करणार.
– विवाह समारंभासाठी पोलिस परवानगी आवश्यक.


Back to top button
Don`t copy text!