राज्यमंत्री धोत्रे यांचे जिल्हाधिकाऱ्यांना आवाहन
स्थैर्य, नवी दिल्ली, दि. 11 : केंद्रीय इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान, मनुष्यबळ विकास व दळणवळण राज्यमंत्री संजय धोत्रे यांच्या निर्देशानुसार भारत सरकारच्या इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाची आरोग्य सेतू अॅप टीम आणि महाराष्ट्र राज्यातील सर्व जिल्हाधिकारी आणि एनआयसीचे डीआयओ यांच्या दरम्यान चर्चा करण्यासाठी आज व्हिडिओ कॉन्फरन्सचे आयोजन केले होते. आरोग्य सेतू अॅपच्या विविध बाबींबाबत राज्यातील क्षेत्रस्तरीय अधिकाऱ्यांमध्ये जागरूकता वाढविणे आणि त्यांच्याकडून क्षेत्र-स्तरावरील माहिती प्राप्त करणे हे या चर्चेचे उद्दीष्ट्य होते. राज्यमंत्री धोत्रे यांच्यासह या परिषदेत महाराष्ट्र सरकारचे आरोग्य मंत्री राजेश टोपे आणि महराष्ट्र सरकारचे माहिती तंत्रज्ञान मंत्री सतेज पाटील देखील उपस्थित होते.
परिषदेच्या वेळी हे स्पष्ट झाले की, आरोग्य सेतू व्यासपिठाद्वारे उपलब्ध आकडेवारीचे विश्लेषण राज्यातील रोगाच्या संक्रमणाच्या गतिशीलतेबद्दल सूक्ष्म आणि अति-सूक्ष्म दोन्ही गोष्टी समजून घेण्यासाठी उपयुक्त आहे. या आकडेवारीचा प्रभावी आणि वेळेवर उपयोग केल्यास हॉटस्पॉट विकसित होण्याआधीच त्यांच्यावर आळा घालण्यामध्ये आणि नियोजित व लक्ष्यित पद्धतीने आरोग्य पायाभूत सुविधांचे वाटप आणि वेळेवर त्यात वृद्धी करण्यासाठी ही आकडेवारी महत्वपूर्ण ठरू शकते.
जिल्हाधिकाऱ्यांनी आपापल्या जिल्ह्यात कोविड संकटावर मात करण्यासाठी आरोग्य सेतू डेटा वापरताना त्यांना आलेले अनुभव सामायिक केले. आजारावर नियंत्रण मिळविण्यासाठी जिल्हाधिकारी आणि क्षेत्रीय स्तरावरील अधिकाऱ्यांनी केलेल्या प्रयत्नांचे धोत्रे यांनी कौतुक केले. राज्य सरकारला त्यांनी आश्वासन दिले की भारत सरकारचे माहिती आणि तंत्रज्ञान मंत्रालय, आरोग्य सेतु आकडेवारीच्या विश्लेषणात्मक इष्टतम वापराच्या दृष्टीने क्षेत्रीय स्तरावरील अधिकाऱ्यांना पुढील प्रशिक्षण देण्यासाठी तातडीने मदत करेल.
क्षेत्रस्तरीय अधिकाऱ्यांना संबोधित करताना धोत्रे म्हणाले की, कोविड-19 च्या विरोधात लढाईसाठी आरोग्य सेतु अॅपचा व्यापक वापर आवश्यक आहे. कोविड-19 चे संभाव्य धोके ओळखण्यासाठी आणि पुढील संकटाचा सामना करण्यासाठी जिल्हा प्रशासनाद्वारे त्याच्या आकडेवारीचा पूर्णपणे वापर केला जाऊ शकतो. महाराष्ट्र सरकारचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी कोविड-19 विरुद्धच्या लढाईतील तंत्रज्ञानाचे महत्व सांगितले. धोत्रे याच्या आदेशानुसार क्षेत्रीय अधिकाऱ्यांसोबत तांत्रिक टीमचा संवाद साधण्यासाठी आयोजित केलेल्या या उपक्रमाची त्यांनी प्रशंसा केली. महाराष्ट्र सरकारचे माहिती आणि तंत्रज्ञान मंत्री सतेज पाटील यांनी आरोग्य सेतु अॅपच्या वापरावर भर दिला आणि जिल्हाधिकाऱ्यांना व्यापक प्रशिक्षण देऊन त्याचा उपयोग आणखी वृद्धिंगत होईल अशी सूचना त्यांनी केली.
या परिषदेला इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाचे सचिव अजय प्रकाश शॉनी उपस्थित होते, त्यांनी राज्य अधिकाऱ्यांना संबोधित केले आणि त्यांना आरोग्य सेतु अॅपच्या माध्यमातून उपलब्ध माहितीच्या वापरातील बारकावे समजावून सांगितले. महाराष्ट्र सरकार, आरोग्य, प्रधान सचिव प्रदीप व्यास; महाराष्ट्र सरकार, आरोग्य, संचालक डॉ सौ. साधना तायडे; भारत सरकार- एनआयसी डीजी, नीता वर्मा; भारत सरकार- एनआयसी डीडीजी, आर. एस. मणी; भारत सरकार- एनआयसी डीडीजी, सीमा खन्ना; महाराष्ट्र सरकार, वैद्यकीय शिक्षण व संशोधन, संचालक डॉ. तात्याराव लहाने; आय.आय.टी. मद्रासचे प्रा. व्ही. कामकोटी हे देखील या परिषदेला उपस्थित होते आणि त्यांचाजवळील मौल्यवान माहिती त्यांनी दिली.