स्थैर्य, दि.२: व्हिसांवरील निर्बंध ३१ मार्च २०२१ पर्यंत वाढवण्याचा निर्णय अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी घेतला. परिणामी नोकरीसाठीच्या व्हिसाला 3 महिन्यांपर्यंत परवानगी मिळणार नाही. मात्र, आपत्कालीन स्थितीत व्हिसाला परवानगी मिळू शकेल.
ट्रम्प म्हणाले, अमेरिकेतील बाजारपेठ व नागरिकांच्या आरोग्यावर कोरोनाचा प्रभाव अजूनही आहे. यामुळे व्हिसावरील निर्बंध पुढील तीन महिने वाढवले जात आहेत. यात एच1बी, एच2बी, जे1, एल, एल1 व्हिसांचा समावेश आहे. याशिवाय अमेरिकेत कामासाठीच्या व्हिसावर काम करणाऱ्यांच्या कुटुंबीयांनाही ग्रीन कार्ड मिळणार नाही.
व्हिसाचा असा उपयोग
एच१ बी : आयटी व्यावसायिक याद्वारे ६ वर्षांपर्यंत अमेरिकेत काम करतात. ते भारतीयांत सर्वाधिक लोकप्रिय. अमेरिकेकडून दरवर्षी असे सरासरी ८५,००० व्हिसा जारी होतात. मात्र २०२० मध्ये ही संख्या ६५,००० पर्यंत मर्यादित ठेवली.
एच२ बी : शेती वगळता इतर कामांकरिता अल्पावधीसाठी अमेरिकेत येणाऱ्या विदेशी कामगारांना हा व्हिसा दिला जातो.
जे १ : घरकाम करणाऱ्यांसाठी हा व्हिसा जारी करण्यात येत असतो.
एल : याद्वारे कंपन्या कुठल्याही लेबर सर्टिफिकेटशिवाय आपल्या वरिष्ठ कर्मचाऱ्यांना अमेरिकेत वास्तव्यास ठेवतात.