दैनिक स्थैर्य । दि.०५ जानेवारी २०२२ । सातारा । सहकाराचा मानबिंदू असलेल्या अजिंक्यतारा साखर कारखान्यास आ. श्रीमंत छ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या रूपाने खंबीर नेतृत्व लाभल्यामूळे कारखान्याने सर्व बाजूने विकासात्मक उभारी घेतलेली आहे. त्यांच्या मार्गदर्शनाखाली काटकसरीचे धोरण व मुल्यवर्धित उपक्रम यशस्वीपणे राबविले जात असून, अनंत अडचणीवर मात करून आर्थिक दृष्ट्या सक्षम होत असलेला या कारखान्याचे जिल्हयातच नव्हे तर राज्यातही कामकाज उल्लेखनिय व आदर्शवत आहे. अनेक पुरस्कार मिळवलेल्या या कारखान्याच्या दोन सभासदांना सन २०२०-२१ च्या गाळप हंगामासाठी वसंतदादा शुगर इन्स्टिटयूट पुणे यांचा ऊस भूषण पुरस्कार जाहिर झाला आहे.
अजिंक्यतारा कारखान्यास देश पातळीवरील नॅशनल फेडरेशनकडून सन २०१९-२० चा ” बेस्ट केन डेव्हलपमेंट इन हाय रिकव्हरी एरीया ” व सन २०२०-२१ करीता “हायस्ट शुगर रिकव्हरी इन हाय रिकव्हरी एरीया “इफिशियन्सी पुरस्कार प्राप्त झालेले आहेत. वसंतदादा शुगर इन्स्टिटयूट, पुणे या टेक्निकल संस्थेकडून दरवर्षी राज्यातील प्रगतशील ऊस उत्पादक शेतकऱ्यांना ऊस भूषण पुरस्काराने गौरविण्यात येते. सन २०२०-२१ च्या गाळप हंगामाकरीता वसंतदादा शुगर इन्स्टिटयूट यांच्याकडून ऊस भूषण पुरस्कार जाहिर झालेले असून, सन २०२०-२१ या गळीत हंगामातील अजिंक्यतारा कारखान्याचे सभासद ऊस उत्पादक शेतकरी श्रीमती विमल धोंडीराम पवार रा. वर्णे या महिला शेतकरी यांनी पूर्व हंगामी को ८६०३२ वाणाचे हेक्टरी ३२३.४५ मे. टन (एकरी १२९.३८ मे. टन) ऊस उत्पादन ५० आर क्षेत्रातून घेऊन प्रथम क्रमाकांचा कै. यशवंतराव चव्हाण राज्यस्तरीय ऊस भूषण पुरस्कार प्राप्त झालेला आहे. तसेच कारखान्याचे सभासद तथा कारखान्याचे व्हाईस चेअरमन विश्वास रामचंद्र शेडगे यांनी सुरू हंगाम गटात को ८६०३२ वाणाचे ४० आर क्षेत्रातून २०२.६० मे.टन ऊस उत्पादन घेऊन राज्यातील दक्षिण विभागातून प्रथम क्रमांकाचा ऊस भूषण पुरस्कार प्राप्त केला आहे. वसंतदादा शुगर इन्स्टिटयूटकडून लवकरच या पुरस्कारांचे वितरण केले जाणार आहे.
कारखान्याचे मार्गदर्शक संचालक आ. शिवेंद्रसिंहराजे भोसले व संचालक मंडळाने पुरस्कार प्राप्त शेतकऱ्यांचे अभिनंदन करून कौतूक केले. यावेळी मार्गदर्शक संचालक आ. शिवेंद्रसिंहराजे भोसले म्हणाले की, या पुरस्काराने अजिंक्यतारा कारखान्याच्या नावलौकिकात भर पडली असून अजिंक्यतारा कारखान्याची मान उंचावलेली आहे. एकरी ऊस उत्पादन वाढीसाठी कारखान्याच्या ऊसविकास विभागाकडून सातत्याने ऊस उत्पादकांना मार्गदर्शन व शास्त्रोक्त पध्दतीचे ज्ञान अवगत करून दिले जाते. ऊस भूषण पुरस्कार प्राप्त शेतक-यांनी ऊस उत्पादन वाढीसाठी राखलेले व्यवस्थापन व घेतलेली मेहनत ही कौतुकास्पद असून सर्व शेतक-यांना प्रेरणादायी आहे. यावेळी कारखान्याचे चेअरमन सर्जेराव दि.सावंत, व्हाईस चेअरमन विश्वास रा. शेडगे, सर्व संचालक, कार्यकारी संचालक जिवाजी मोहिते आणि सर्व अधिकारी उपस्थित होते.