स्थैर्य, सातारा, दि.२३: पळशी, ता. माण येथील पर्यायी जमिनीच्या बदली प्रस्तावासंदर्भात गट नं 1792 मधील 40 आर क्षेत्राचे अनाधिकाराने परस्पर वाटप केल्याचा आरोप उरमोडी प्रकल्पग्रस्त दीपक शंकर देवरे (कातवडी बु. पो. नित्रळ, ता. सातारा) यांनी केला. पर्यायी जमिनीचे वाटप योग्य पद्धतीने न झाल्यास 29 रोजी जिल्हाधिकार्यांच्या दालनात आत्मदहन करण्याचा इशारा देवरे यांनी पत्रकार परिषदेत दिला.
देवरे यांच्या मालकीची जवळपास साडेचार एकर जमीन 1997 उरमोडी धरण क्षेत्रात गेली. त्याला पर्याय जमीन पळशी, ता. माण येथे देण्याचा शासन निर्णय झाला होता. देवरे यांना 1792 गटातील 1 हेक्टर व वीस आर क्षेत्राचे वाटप झाले. मात्र संकलन पत्रात 2 हेक्टर 26 आर क्षेत्राचे वाटप असताना गट क्रं. 40 मधील केवळ 1 हेक्टर 20 आर क्षेत्राची नजरचुकीने नोंद झाली. त्यामुळे सुमारे 40 आर क्षेत्र देवरे यांना कमी मिळाले. संकलन पत्राच्या दुरुस्तीसाठी देवरे यांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागला. सतत तीन वर्ष संघर्ष केल्यावर संकलन पत्र दुरुस्त झाले. संबंधित जमिनीच्या वाटपासाठी त्यांनी प्रांत सातारा यांनी अर्ज केला असताना जमिन शिल्लक नसल्याचे कारण देण्यात आले. पुन्हा महसूल दफ्तरी संघर्ष करून 40 आर जमिनीचा आदेश मिळवून देवरे पळशी येथे जमिनीचा ताबा घेण्यासाठी गेले. यावेळी सुमारे पस्तीस ते चाळीस अनोळखी व्यक्तींनी त्यांना घेरून जीवे मारण्याची धमकी दिली. देवरे यांना म्हसवड पोलिसांचे संरक्षण घ्यावे लागले. यानंतर पोलिस असतानाही गुंड प्रवृत्तीचे लोक मोजणी कामात अडथळा आणत होते. जमिनीशी काडीमात्र संबंध नसताना व मुळ जमिनीचे मालक हजर नसताना पोलिसांसमोर बोगस व्यक्ती उभ्या करून मूळ मालक असल्याचे भासवत होते. दरम्यान, तलाठी संतोष ढोले, मंडलाधिकारी करणे, सर्वेअर ए. डी. जाधव यांनी त्या जमिनीची नोंद काशिनाथ सखाराम लोटेकर यांच्या नावे पाच हजार रुपयाच्या मोबदल्यात घातल्याचा आरोप दीपक देवरे यांनी केला.
याप्रकरणी न्याय न मिळाल्यास 29 रोजी जिल्हाधिकार्यांच्या दालनात आत्मदहन करण्याचा इशारा त्यांना निवेदनाद्वारे दिला. या निवेदनाच्या प्रती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, विरेाधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आदींनाही देण्यात आल्या आहेत.