उरमोडी धरणाला ‘छत्रपती अभयसिंहराजे भोसले जलाशय’ नाव; राज्य शासनाचा इतिहास आणि लोकभावनेचा सन्मान


सातारा, खटाव व माण तालुक्यांसाठी वरदान ठरलेल्या उरमोडी धरणाच्या जलाशयाला ‘छत्रपती अभयसिंहराजे भोसले जलाशय’ असे नाव देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय राज्य शासनाने घेतला आहे.

स्थैर्य, सातारा, दि. ८ एप्रिल : सातारा, खटाव व माण तालुक्यातील सिंचन व्यवस्थेला भक्कम आधार देणाऱ्या आणि जिल्ह्यातील मोठा प्रकल्प म्हणून ओळखल्या जाणाऱ्या उरमोडी धरणाच्या जलाशयाचे ‘छत्रपती अभयसिंहराजे भोसले जलाशय’ असे नामकरण करण्याचा निर्णय राज्य शासनाने बुधवारी घेतला आहे. विशेष बाब म्हणून जलसंपदा विभागाचा हा शासन निर्णय सातारा जिल्ह्याचा इतिहास, परंपरा आणि स्थानिक लोकभावनेचा मोठा सन्मान करणारा ठरला आहे.

दुष्काळी तालुक्यांना वरदान

उरमोडी धरणामुळे जिल्ह्याच्या कृषी क्षेत्राला मोठा फायदा झाला आहे. विशेषतः केवळ पावसावर अवलंबून असलेल्या माण आणि खटाव तालुक्यातील शेतकऱ्यांना या धरणामुळे मोठा दिलासा मिळाला आहे. या धरणामुळे वर्षभर पाणी उपलब्ध झाल्याने पिकांची उत्पादकता वाढली असून पीकपद्धतीतही मोठे सकारात्मक बदल झाले आहेत. दुष्काळी परिस्थितीत शेतकऱ्यांना स्थैर्य देणारा जलस्रोत म्हणून उरमोडी धरण अत्यंत महत्त्वाचे ठरले असून, सिंचनामुळे ग्रामीण अर्थव्यवस्थेला बळ मिळून रोजगाराच्या संधी वाढल्या आहेत.

स्व. अभयसिंहराजे भोसले यांचे महत्त्वपूर्ण योगदान

या धरणाच्या उभारणीत स्व. अभयसिंहराजे भोसले यांचा मोलाचा वाटा राहिला आहे. त्यांनी सातारा जिल्ह्याच्या राजकारणात एक प्रभावी नेतृत्व निर्माण केले. सहकार क्षेत्रात विविध संस्थांच्या माध्यमातून त्यांनी शेतकरी आणि सामान्यांच्या विकासाला मोठी गती दिली. सामाजिक कार्यातून शिक्षण, आरोग्य व ग्रामीण विकासात त्यांचे भरीव योगदान राहिले आहे. स्थानिक पातळीवरील दांडगा लोकसंपर्क आणि विकासकामांमुळे त्यांची एक वेगळी आणि स्वतंत्र ओळख निर्माण झाली होती.

अनेक वर्षांपासून या जलाशयाला ऐतिहासिक व स्थानिक महत्त्व असलेल्या व्यक्तिमत्त्वाचे नाव देण्याची मागणी शासनाकडे सातत्याने होत होती. आता ‘छत्रपती अभयसिंहराजे भोसले जलाशय’ असे नाव दिल्याने स्थानिक पातळीवर ऐतिहासिक परंपरेचा मोठा गौरव झाला असून, सातारा जिल्ह्याच्या सामाजिक व सांस्कृतिक ओळखीला नवे कोंदण मिळाले असल्याची भावना जनमाणसात निर्माण झाली आहे.

ना. शिवेंद्रराजेंकडून वारसा पुढे

स्व. छत्रपती अभयसिंहराजे भोसले यांचा हाच जनसेवेचा वारसा सध्या राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री ना. शिवेंद्रराजे भोसले हे अत्यंत समर्थपणे चालवताना दिसत आहेत. त्यांच्याच अथक प्रयत्नांतून आणि पाठपुराव्यातून उरमोडी धरण प्रकल्पाच्या दोन्ही कालव्यांचे काम मार्गी लागले आहे. या जलाशयाला स्व. अभयसिंहराजे भोसले यांचे नाव दिल्याच्या शासनाच्या निर्णयामुळे संपूर्ण सातारा जिल्ह्यातून मोठे समाधान व्यक्त केले जात आहे.


Back to top button
Don`t copy text!