स्थैर्य, फलटण : फलटण शहर व तालुक्यातील करोना संसर्ग झालेल्या रुग्णांवरील उपचारासाठी शहरातील मुलींच्या जुन्या वसतीगृहाची इमारत सर्वसाधने सुविधांनी सुसज्ज करुन आयसीयुच्या 5 बेड व अन्य 35 बेडसह तातडीने तयार करण्याच्या सूचना देत अन्य आवश्यक वैद्यकिय उपचारासाठी साधने सुविधा शासन व नगर परिषदेच्या माध्यमातून तातडीने उपलब्ध करुन देण्याची ग्वाही महाराष्ट्र विधान परिषद सभापती ना. श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांनी दिली आहे.
फलटण शहर व तालुक्यातील करोना प्रादुर्भाव नियंत्रण योजनेच्या कामकाजाच आढावा घेण्यासाठी येथील शासकीय विश्रामगृहात आयोजित बैठकीत ना. श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर बोलत होते. यावेळी आ. दिपक चव्हाण, महाराष्ट्र खो-खो असोसिएशनचे अध्यक्ष श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर, प्रांताधिकारी डॉ. शिवाजीराव जगताप, उपविभागीय पोलीस अधिकारी तानाजी बरडे, प्रभारी तहसीलदार आर.सी.पाटील, नगर परिषद मुख्याधिकारी प्रसाद काटकर, गटविकास अधिकारी अमिता गावडे, शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरिक्षक प्रताप पोमण, सहाय्यक पोलीस निरिक्षक नागटिळक, उपजिल्हा रुग्णालयाचे अधिक्षक डॉ. व्यंकट धवन, डॉ. सुभाष गायकवाड, तालुका वैद्यकिय अधिकारी डॉ. विक्रांत पोटे, सार्वजनिक बांधकाम खात्याचे उपअभियंता महेश नामदे, डॉ. सौ. सोनवलकर, डॉ. जे. टी. पोळ, डॉ. संजय राऊत, डॉ. सोनवणे उपस्थित होते.
फलटण शहर व तालुक्यात मोठ्या संख्येने पुणे, मुंबई किंवा अन्य ठिकाणाहुन आलेल्या या तालुक्यातील लोकांची वैद्यकिय तपासणी व होम क्वारंटाईन व्यवस्था उत्तम राखल्यानेच आतापर्यंत करोना संसर्ग नियंत्रणात ठेवण्यात यश आले असून यापुढेही सर्वांनी आपल्या व कुटुंबाची त्याचप्रमाणे गावाच्या आरोग्याची काळजी घेवून कोणीही संशयीत असल्यास तातडीने वैद्यकिय यंत्रणेशी संपर्क साधून उपचार घ्यावेत असे आवाहन करतानाच शासनाने घालुन दिलेल्या नियम, निकषांची काटेकोर अंमलबजावणी केली पाहिजे त्यासाठी कारणाशिवाय घराबाहेर पडू नका, बाहेर पडलात तरी मास्क वापरा, हात धुवा, सॅनीटायझर वापरा, कोठेही गर्दी करु नका असे आवाहन ना. श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांनी या बैठकीच्या निमित्ताने शहर व तालुक्यातील नागरिकांना केले आहे.
झिरपवाडी येथील रुग्णालय केंद्र शासनाच्या योजनेतील आयुष रुग्णालय म्हणून कायम स्वरुपी उभे करण्याच्या दृष्टीने प्रस्ताव तयार करावा त्याचप्रमाणे शहरातील उपजिल्हा रुग्णालयाचा 100 खाटांचा विस्तार प्रकल्प पूर्णत्वास नेण्याच्या दृष्टीने आपण शासन स्तरावर तातडीने निर्णय घेण्यासाठी प्रयत्नशील आहोत. दरम्यान करोना उपचारासाठी नगर परिषदेने मुलींच्या जुन्या वसतीगृहाची इमारत उपलब्ध करुन देवून तेथे केलेल्या व्यवस्थेनुसार अन्य काही आवश्यक साधने सुविधा तातडीने उपलब्ध करुन तेथे दोन दिवसात करोना उपचार केंद्र सुरु करावे अशा स्पष्ट सूचना ना. श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांनी प्रशासनाला दिल्या आहेत.
शहर व तालुक्यातील पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या आतापर्यंत 53 झाली असून त्यापैकी २७ रुग्ण बरे झाले असून 6 जणांचे दुर्देवी निधन झाले आहे. उर्वरित 20 रुग्णांवर उपचार सुरु आहेत. आगामी काळात या रुग्णांची संख्या वाढण्याची शक्यता लक्षात घेवून त्यासाठी शहरातील मुलींच्या जुन्या वसतीगृहाची इमारत सुसज्ज रुग्णालयात रुपांतरीत करण्यात आली आहे. तेथे शासकीय वैद्यकिय यंत्रणेला शहरातील खाजगी रुग्णालये व डॉक्टरांनी सहकार्य करण्याचे मान्य केल्याचे नमुद करीत आगामी काळात गरज भासली तर ग्रामीण भागातील काही प्रा. आरोग्य केंद्र करोना उपचार केंद्र म्हणून सुसज्ज ठेवण्याच्या दृष्टीने नियोजन करण्यात येत आहे. वास्तविक खाजगी रुग्णालयांनी याकामी पुढे आले पाहिजे कायद्यातील तरतुदींच्या आधारे सक्ती केली जाण्यापूर्वीच शहर व तालुक्यातील सध्याच्या वैद्यकिय उपचार यंत्रणेला खाजगी रुग्णालये व डॉक्टरांनी साथ व सहकार्य करणे त्यांची नैतिक जबाबदारी आहे. तथापी त्यांनी मदत न केल्यास शासन पूर्णपणे आपली यंत्रणा उभारुन रुग्णांसाठी सर्वप्रकारची साधने सुविधा उपलब्ध करुन देण्यात कोठेही कमी पडणार नसल्याची ग्वाही यावेळी ना. श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांनी स्पष्ट शब्दात दिली.
आ. दिपक चव्हाण व श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांनी शहर व तालुक्यात प्रशासनाच्या माध्यमातून करोना प्रादुर्भाव नियंत्रणासाठी सर्व उपाय योजन्यात आले आहेत. गावातील विशेष समितीच्या माध्यमातून दररोज गावाचा आढावा घेतला जात असून करोना संशयीत आढळल्यास तातडीने तपासणी व उपचाराची व्यवस्था करण्यात आल्याचे निदर्शनास आणून दिले.
दरम्यान प्रांताधिकारी डॉ. शिवाजीराव जगताप यांनी आतापर्यंत तालुक्यात आढळलेले रुग्णांविषयी, त्यांच्यावरील उपचाराविषयी, रुग्ण आढळलेल्या गावात आणि फलटण शहरात घेण्यात आलेल्या खबरदारी विषयी, कंटेंनमेंट झोन मधील वैद्यकीय सर्वेक्षणाविषयी सविस्तर माहिती देवून गेल्या दोन अडीच महिन्यात राबविण्यात आलेल्या करोना नियंत्रण उपाय योजनाविषयी सविस्तर विवेचन केले.
संस्थात्मक विलगी करणासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर शासकीय वसतीगृहात 90, कृषी महाविद्यालय मुलींच्या वसतीगृहात 70 व मुलांच्यावसतीगृहात 50 आणि मालोजीराजे शेतीशाळा परिसरातील विद्यार्थी वसतीगृहात 40 अशा एकुण 250 खाटांची व्यवस्था करण्यात आली असून त्यापैकी तेथे सध्या 113 व्यक्ती दाखल आहेत. फलटण शहरासह तालुक्यात आतापर्यंत 53 बाधीत रुग्ण आढळले त्यापैकी 27 बरे झाले असून 6 जणांचे दुर्देवी निधन झाले आहे. 20 जणावर उपचार सुरु असल्याचे प्रांताधिकार्यांनी सांगितले.
मुख्याधिकारी प्रसाद काटकर यांनी शहरातील करोना नियंत्रण उपाय योजना, त्यामध्ये प्रामुख्याने शहर स्वच्छता, जंतुनाशक फवारणी, गर्दीवर नियंत्रणासाठी राबविण्यात आलेली पासाची व्यवस्था, सर्व 15 हजार कुटुंबांना उपलब्ध करुन देण्यात आलेल्या अर्सेनिक अल्बम 30 गोळ्यांचे वाटप वगैरे माहिती दिली. नगर परिषद दवाखान्याच्या माध्यमातून वैद्यकिय उपचार व करोना सर्वेक्षण सुरु असल्याचे निदर्शनास आणून दिले.
उपविभागीय पोलीस अधिकारी तानाजी बरडे यांनी कोणत्याही परिस्थितीत परजिल्ह्यातील व्यक्ती या तालुक्यात पासाशिवाय येणार नाही यासाठी विशेष खबरदारी घेण्यात येत असून विशेषत: शिरवळ येथील तपासणी नाक्यावर 4 पोलीस अधिकारी व 28 पोलीस कर्मचार्यांच्या माध्यमातून 24 तास तपासणी नाके कार्यान्वित ठेवण्यात आल्याचे तसेच शहर व तालुक्यात कोठेही गर्दी होणार नाही, वाहनांची वर्दळ वाढणार नाही यासाठी योग्य नियंत्रण राखण्यात येत असल्याचे स्पष्ट केले.