युवकांनी महापुरूषांची चरित्रे, विचार व कार्य अभ्यासण्याची नितांत गरज – अ‍ॅड. संभाजीराव मोहिते

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य | दि. १६ मार्च २०२३ | फलटण |
आज युवकांनी महापुरूषांची चरित्रे आणि त्यांची विचार व कार्य अभ्यासण्याची नितांत गरज आहे, असे प्रतिपादन राजर्षी शाहू महाराजांचे चरित्र लिहिणारे अ‍ॅड. संभाजीराव मोहिते यांनी केले.

मुधोजी महाविद्यालयात प्राचार्य शिवाजीराव भोसले प्राध्यापक प्रबोधिनीच्या वतीने जागर लोकराजाचा, स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव आणि छत्रपती शाहू महाराज यांच्या स्मृतीशताब्दी वर्षा निमित्ताने अ‍ॅड. संभाजीराव मोहिते, हायकोर्ट, मुंबई यांचे ‘लोकराजा राजर्षी शाहू महाराज’ या विषयावर व्याख्यान आयोजित करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. महाविद्यालयातील युवकांपुढे बोलत असताना अ‍ॅड. संभाजीराव मोहिते यांनी राजर्षींचे जीवनचरित्र आपल्या अस्खलित वक्तृत्वपूर्ण शैलीतून उलगडले.

यावेळी अ‍ॅड. मोहिते यांनी राजर्षींचा प्रेरणादायी, स्फूर्तीदायी असा जीवनपट जन्मापासून ते अखेरीपर्यंत आपल्या रसाळ वाणीतून विद्यार्थ्यांच्या मनपटलावर उमटविला. त्यांनी तत्कालीन करवीर संस्थानातील एका मोठ्या दुष्काळाला सामोरे जाण्यासाठी काय केले, हे सांगितलेच शिवाय त्यानंतर दुसर्‍या मोठ्या प्लेगसारख्या संकटाला कसे धैर्यपूर्वक सामोरे गेले, हेही सांगितले. राजर्षी शाहू महाराजांचे व्यक्तिमत्व, त्यांचे विचार किती उदात्त आणि व्यापक होते हे दाखवून दिलेच, शिवाय कनवाळू राजा कसा असतो हेही आपल्या व्याख्यानातून त्यांनी स्पष्ट केले.

सामाजिक न्याय, वेदोक्त प्रकरण, सर्वसामान्यांच्या शिक्षणाविषयीची तळमळ, आरक्षण याविषयी त्यांनी राबवलेली धोरणे आणि त्यामागे असलेली त्यांची उदात्त, मानवतावादी विचारसरणी या विषयीही सुंदर असे विवेचन अ‍ॅड. मोहिते यांनी आपल्या उद्बोधक अशा व्याख्यानातून केले.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. पी. एच. कदम होते. त्यांनी अध्यक्षीय मनोगतातून पुरोगामी महाराष्ट्राच्या योगदानामध्ये राजर्षी शाहू महाराजांचा सिंहाचा वाटा होता, हे नमूद करून युवकांनी त्यांचे जीवनचरित्र वाचावे, असे आवाहन केले. राजर्षी हे फक्त क्रांतिकारक विचारवंत नव्हते तर प्रत्यक्षात त्यांनी दलितांसाठी महिलांसाठी व विद्यार्थ्यांसाठी वसतीगृहाच्या माध्यमातून कृतीनिष्ठ कार्य केल्याचे नमूद केले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक महाविद्यालयीन विकास समितीचे सदस्य प्रा. डॉ. अशोक शिंदे यांनी केले तर आभार आय.क्यू. एसी. समन्वयक प्रा. डॉ. टी. पी. शिंदे यांनी मानले. सूत्रसंचालन प्रा. अभिजित धुलगुडे यांनी केले. यावेळी कार्यक्रमाला महाविद्यालयातील सर्व विद्यार्थी, प्राध्यापक व कर्मचारी उपस्थित होते.


Back to top button
Don`t copy text!