दैनिक स्थैर्य । दि. २२ ऑगस्ट २०२२ । मुंबई । उर्ध्व गोदावरी प्रकल्पाचा प्रस्ताव राज्यस्तरीय तांत्रिक समितीच्या शिफारशींसह शासनाकडे प्राप्त झाला आहे. या प्रस्तावाला लवकरच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची मान्यता घेऊन हा प्रस्ताव एक महिन्याच्या आत मंत्रिमंडळाच्या बैठकीत मांडला जाईल, असे उपमुख्यमंत्री तथा जलसंपदामंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानसभेत सांगितले.
महाराष्ट्र विधानसभा नियम 105 अन्वये उपस्थित केलेल्या लक्षवेधी सूचनेस उत्तर देताना त्यांनी ही माहिती दिली.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले की, या प्रकल्पाच्या चौथ्या सुधारित प्रशासकीय मान्यतेअंतर्गत मांजरपाडा वळण योजना, धोंडाळपाडा, ननाशी, पायरवाडा पुणेगाव कालवा, दरसवाडी कालवा यांचा समावेश आहे. या प्रस्तावावर व्यय अग्रक्रम समितीच्या बैठकीत चर्चा होऊन प्रस्ताव विहीत पद्धतीने मंत्री मंडळासमोर सादर करण्यात यावा, असा निर्णय झाला आहे. त्यानुसार कार्यवाही केली जाईल.
समुद्रात वाहून जाणाऱ्या पाण्याबाबतही नुकतीच एक बैठक घेण्यात आली आहे. त्याबाबतचा जल आराखडा तयार करण्यात आलेला असून त्याची तांत्रिक व्यवहार्यता तपासणी करण्यात येत आहे. याबाबतचे काम कालबद्ध पद्धतीने करण्यात येईल, असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.
याबाबतच्या चर्चेत छगन भुजबळ, धनंजय मुंडे, हरिभाऊ बागडे यांनी सहभाग घेतला.