एमएमआरडीएच्या विविध प्रकल्पांच्या प्रगतीचा नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे, उपनगर पालकमंत्री आदित्य ठाकरे यांनी घेतला आढावा

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


स्थैर्य, मुंबई, दि.२५: मुंबई महानगर क्षेत्राच्या दृष्टीने महत्त्वाच्या असलेल्या आणि एमएमआरडीएमार्फत हाती घेण्यात आलेल्या विविध प्रकल्पांच्या कामांचा आज नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे आणि राज्याचे पर्यावरण, पर्यटन मंत्री तथा मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री आदित्य ठाकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत आढावा घेण्यात आला.

सह्याद्री अतिथीगृह येथे झालेल्या या बैठकीस मंत्री श्री. शिंदे हे ऑनलाईन उपस्थित होते, तर यावेळी एमएमआरडीएचे महानगर आयुक्त आर. ए. राजीव, मुंबई महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त पी. वेलरासू, झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी सतिश लोखंडे यांच्यासह इतर वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

यावेळी पश्चिम द्रुतगती महामार्गावरील प्रकल्प, वरळी-शिवडी कनेक्टर, प्रस्तावित नरिमन पॉईंट-कफ परेड कनेक्टर, कल्याण रिंग रोड प्रकल्प या प्रकल्पांचे सादरीकरण झाले आणि त्यांच्या प्रगतीचा आढावा घेण्यात आला.

नगरविकास मंत्री श्री. शिंदे म्हणाले की, मुंबई महानगर क्षेत्राचा विकास गतिमान करणारे हे सर्व प्रकल्प आहेत. एमटीएचएलचे काम वेगात सुरू आहे. त्याच पद्धतीने वरळी-शिवडी कनेक्टरचे कामही वेगाने करण्यात येईल. शहरातून जाणाऱ्या दोन्ही द्रुतगती मार्गावरील सायकल ट्रॅकचा प्रकल्पही महत्त्वाचा असून एमएमआरडीएच्या सर्व प्रकल्पांना गतिमान करण्यासाठी आणि ते निर्धारित वेळेत पूर्ण करण्यासाठी शासनामार्फत संपूर्ण सहयोग देण्यात येईल.

पालकमंत्री श्री. ठाकरे म्हणाले की, शहरातील वाहतूक सुरळीत आणि गतिमान करण्याच्या दृष्टीने शिवडी-वरळी कनेक्टर, प्रस्तावित नरिमन पॉईंट-कफ परेड कनेक्टरसारखे प्रकल्प फार महत्त्वाचे ठरणार आहेत. दोन्ही द्रुतगती महामार्गावरील पादचारी मार्ग आणि सायकल ट्रॅकसारखे उपक्रम पर्यावरणपूरक आहेत. या विविध प्रकल्पांची कामे नियोजित वेळेत पूर्ण करण्याच्या दृष्टीने कार्यवाही करण्यात यावी, अशा सूचना त्यांनी दिल्या.

एमएमआरडीएने पश्चिम द्रुतगती महामार्ग येथे अॅक्सेस कंट्रोल, तसेच पश्चिम आणि पूर्व द्रुतगती महामार्गावर पादचारी मार्ग आणि सायकल ट्रॅकचे काम हाती घेतले आहे. यामुळे वाहतुकीची कोंडी कमी होईल. तसेच सुशोभिकरणामुळे महामार्गावरील प्रवासाचा अनुभव अधिक सुखद होईल.

वाहतूक कोंडीचा प्रश्न सोडवून वेगवान प्रवासाला चालना देण्यासाठी वरळी-शिवडी कनेक्टर हा अत्यंत महत्त्वाचा प्रकल्प आहे. यामुळे कोस्टल रोड व एमटीएचएलसुद्धा जोडले जातील. या कामामध्ये विविध एजन्सींचा सहभाग असून समन्वयाच्या दृष्टीने पालकमंत्री श्री. ठाकरे यांच्यामार्फत नियमित मासिक आढावा बैठकीतून पाठपुरावा करण्यात येतो. यामुळे सर्वांमध्ये समन्वय साधून काम वेळेत पूर्ण करण्यास मदत होत आहे.

प्रस्तावित नरिमन पॉईंट-कफ परेड कनेक्टरच्या माध्यमातून शहरातील बँकिंग आणि व्यापाराच्या दृष्टीने महत्त्वाच्या असलेल्या भागातील वाहतूक कोंडीचा प्रश्न सुटण्यास मदत होणार आहे. मच्छीमारांची कोणतीही गैरसोय होणार नाही याचा विचार करुन हा प्रकल्प आखला जात आहे, असे मंत्री श्री. ठाकरे यांनी सांगितले.

कल्याण आणि आसपासच्या भागातील वाहतूक कोडींवर अत्यंत प्रभावशाली उपाय ठरणाऱ्या कल्याण रिंग रोड, दुर्गाडी ब्रीज या कामांच्या प्रगतीचाही आज आढावा घेण्यात आला.


Back to top button
Don`t copy text!