मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्षाचा रुग्ण सेवेचा चढता आलेख

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य । दि. १५ जुलै २०२३ । मुंबई । मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्षाने आपल्या सातत्यपूर्ण कामगिरीचा आलेख कायम राखत अवघ्या एका वर्षात १०,५०० पेक्षा अधिक गोरगरीब -गरजू रुग्णांना एकूण ८६ कोटी ४९ लाख रुपयांची आर्थिक मदत वितरित केली आहे. यामुळे अनेक रुग्णांना अक्षरशः जीवनदान मिळाले आहे. गोरगरीब-गरजू रुग्णांना दुर्धर आणि महागड्या शस्त्रक्रियांसाठी मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्षातून अर्थसहाय्य केले जाते.

मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी मुख्यमंत्री पदाचा कार्यभार स्वीकारताच मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्ष तत्काळ सुरू केला. मागील वर्षी पहिल्याच जुलै महिन्यात १९४ रुग्णांना ८३ लाखांची मदत देण्यात आली. नंतर ऑगस्ट महिन्यात २७६ रुग्णांना १ कोटी ४० लाख, सप्टेंबर महिन्यात ३३६ रुग्णांना १ कोटी ९३ लाख, ऑक्टोबर महिन्यात २५६ रुग्णांना २ कोटी २१ लाख, नोव्हेंबर महिन्यात ५२७ रुग्णांना ४ कोटी ५० लाख, डिसेंबर महिन्यात १०३१ रुग्णांना ८ कोटी ५२ लाख, जानेवारी २०२३ मध्ये १०६० रुग्णांना ८ कोटी ८९ लाख तर फेब्रुवारी २०२३ मध्येज १२३७ रुग्णांना १० कोटी २७ लाख, मार्च २०२३ मध्ये १४६९ रुग्णांना ११ कोटी ९५ लाख, एप्रिल मध्ये १९८४ रुग्णांना ९ कोटी ९३ लाख, मे मध्ये १३२९ रुग्णांना ११ कोटी २५ लाख, तर जून मध्ये विक्रमी ९४२ रुग्णांना १४ कोटी ८१ लाख, रुपयांची वैद्यकीय मदत देण्यात आली आहे.

संवेदनशील मुख्यमंत्री श्री. शिंदे यांच्या सूचनेनुसार मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधीमध्ये विविध आजारांचा समावेश देखील करण्यात आला असल्याची माहिती मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता कक्षाचे प्रमुख मंगेश चिवटे यांनी दिली. यामध्ये अँजिओप्लास्टी, बायपास सर्जरी, कर्करोगावरील शस्त्रक्रिया, केमोथेरपी, डायलिसिस, जन्मतः मूकबधिर लहान मुलांसाठी अत्यावश्यक असणारी कॉकलिअर इनप्लांट शस्त्रक्रिया, सर्व प्रकारचे अवयव प्रत्यारोपण शस्त्रक्रिया, रस्ते अपघात, विद्युत अपघात, भाजलेले रुग्ण, जन्मतः लहान मुलांच्या हृदय शस्त्रक्रिया आदींचा समावेश आहे.


Back to top button
Don`t copy text!