दैनिक स्थैर्य | दि. १ जुलै २०२३ | फलटण |
सातारा जिल्ह्यातील फलटण येथे जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालयाला मंत्रिमंडळाची मंजुरी मिळाली आहे. त्यानुसार फलटण येथे जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालयाची व तालुका कोर्टाची अद्यावत स्वरूपाची सर्वसमावेशक इमारत उभारावी, अशी मागणी सामाजिक कार्यकर्त्या अॅड. कांचनकन्होजा खरात यांनी प्रशासनाकडे केली आहे. याबाबतचे निवेदन फलटण उपविभागीय अधिकार्यांकडे अॅड. खरात यांनी नुकतेच दिले आहे.
अॅड. कांचनकन्होजा खरात यांनी निवेदनात म्हटले आहे की, सध्याचे तालुका कोर्ट हे फलटण येथे विमानतळानजीक आहे. तिथे जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालयासाठी लागणारी जागा मुबलक प्रमाणात नाही. सध्या फलटणमध्ये एकूण न्यायाधीशांचे सात बेंच आहेत. त्यांना कोर्ट चालविण्यासाठी एका ठिकाणी पुरेशी जागा नसल्यामुळे चार बेंच फलटण कोर्टाच्या इमारतीत तर बाकी ३ बेंच हे तहसील कार्यालयाच्या वर आहेत. या दोन्ही कोर्टाच्या ठिकाणांमधील अंतर हे साधारण ३०० मीटर पेक्षा जास्त आहे. त्यामुळे सर्वच नागरिक/पक्षकारांची व वकिलांची तारांबळ उडते. जामिनाचा अर्ज एका ठिकाणी तर त्याची पूर्तता ही दुसर्या ठिकाणी, ही कोणती न्यायदानाची पद्धत? असा सवाल अॅड. खरात यांनी विचारला आहे. जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालयाला मिळालेल्या मंजुरीमुळे बेंचची (न्यायाधीशांची) संख्या कोर्टामध्ये वाढणार आहे. म्हणजेच कामकाजाचा आवाकाही वाढणार असून लोकांची वर्दळी वाढणार आहे; परंतु न्यायालयाची सध्याची जागा अपुरी असल्यामुळे मोठी अडचण होणार आहे.
यास्तव नवीन होणार्या जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालय व तालुका न्यायालयासाठी मुबलक प्रमाणात जागा उपलब्ध करावी व अद्यावत स्वरूपाची सर्वसमावेशक नवीन कोर्ट इमारत उभारावी, अशी मागणी अॅड. कांचनकन्होजा खरात यांनी प्रशासनाकडे केली आहे.