स्थैर्य, नांदेड,दि २०: मुखेड तालुक्यात पावसाने जोरदार हजेरी लावल्याने येथील शेतकऱ्यांची चांगलीच धावपळ उडाली आहे. तालुक्यात शुक्रवारी पहाटे ५ वाजेपासून पावसाने जोरदार हजेरी लावली. या पावसाने रब्बी पिकांना याचा फटका बसला आहे आणि पावसाने हजेरी लावल्यापासून विजेचाही लपंडाव सुरु होता.
मुखेड तालुक्यात मागील दोन-तीन दिवसापासून ढगाळ वातावरण झाले होते. या ढगाळ वातावरणामुळे हवामानात गारठा झाला होता, या दरम्यान काही भागात पावसाच्या सरी बरसल्या. मात्र शुक्रवारी पहाटे ५ वाजेपासून पावसाने मेघगर्जनेसह जोरदार हजेरी लावली. सकाळी दहा वाजेपर्यंत पावसाचा जोर कायम होता. या दरम्यान विजेचा लपंडाव सुरुच होता. या पावसाने रब्बी पीकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे.
हदगाव तालुक्यातील निवघा बाजारात ९ तास विज गुल
हदगाव तालुक्यात निवघा बाजार येथे गुरुवारी रात्री पावसाने हजेरी लावताच काही वेळाने वीजपुरवठा खंडित झाला. हा वीजपुरवठा पुर्वरत होण्यासाठी शुक्रवारी दुपारी बारा वाजले. पावसामुळे वीज वाहिनीत बिघाड झाल्याने तब्बस नऊ तास वीजपुरवठा खंडित झाला होता. या खंडित वीजपुरवठ्यामुळे ग्रामस्थाना अनेक अडचणीला सामोरे जावे लागले.